पुण्यातील एका अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्य़ातील दोन संशयितांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रात्री अटक केली. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच या दोन संशयितांनी आपल्या मूळ गावी आश्रय घेतला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून या दोघा संशयितांना अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे नीलेश रामचंद्र शिं दे आणि शैलेश शंकर शिंदे अशी असून त्यांना चतु:शृंगी  पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.  गेल्या वर्षी पुणे-बंगलोर महामार्गाजवळून गणेश नारायण राठोड या युवकाचे अपहरण करण्यात आले होते.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गणेशचे वडील नारायण मानसिंग राठोड यांनी तक्रार दिली होती. यातील एक संशयित नितीन शिं दे याला चतु:शृंगी  पोलिसांनी अटक केली होती. मात्र इतर चौघेजण फरार होते. या गुन्ह्य़ात वॉन्टेड असलेले नीलेश रामचंद्र शिं दे (वय २७, रा. चांदोली वसाहत, वाळवा जि. सांगली) आणि शैलेश शंकर शिं दे (वय २६, रा. अष्टविनायक नगर चौक, शिरगाव, ता. वाळवा) हे दोघे गुन्ह्णानंतर चतु:शृंगी  पोलिसांना चकवा देऊन गावातच रहात होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस शिपाई चेतन महाजन यांना या दोघांबाबत माहिती मिळाली होती. त्याची खात्री करून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांनाही त्यांच्या गावातूनच ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चतु:शृंगी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची कबुली दिली.

यामध्ये गणेश राठोड याचा मेहुणा विलास चव्हाण याचे अपहरण संशयितांनी केले होते. त्यावेळी गणेशने त्यांच्यात मध्यस्थी केली होती. मात्र चव्हाणने आरोपींना ठरलेली रक्कम दिली नाही म्हणून या पाचजणांनी गणेशचे अपहरण केले होते. यातील दोघांना सांगली पोलिसांनी अटक करून चतु:शृंगी  पोलिसांच्या ताब्यात दिले.