23 April 2019

News Flash

पेंच व्याघ्र प्रकल्पात मच्छीमारांवर कारवाई

अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या २४ जणांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या २४ जणांना अटक

पेंच व्याघ्र प्रकल्पात अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या २४ मच्छीमारांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. तोतलाडोह धरणाच्या बॅकवॉटरमध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान बोटीने गस्त घालत होते. त्यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील उत्तर सलामा क्षेत्रातील दक्षिण बोडलझरा बिटच्या कक्ष क्र.५२८ अंतर्गत तोतलाडोह संरक्षित मॅगझिन नाला नं २ मध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या.

दलाच्या जवानांनी त्वरित पूर्व पेंच वनपरिक्षेत्र कार्यालयाला सूचना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अतुल देवकर यांच्या नेतृत्वात जवानांनी सापळा रचून २४ मच्छीमारांना ताब्यात घेतले. अवैध शिकार प्रतिबंधक पथकाच्या सहाय्यक वनसंरक्षक गीता ननावरे यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, मोहन चाटी, प्रशांत हुमने, वनपाल खोरगडे यांनी मच्छीमारांच्या जबाणी नोंदवल्या. दरम्यान२१ जणांची १५ दिवसासाठी न्यायालयीन तर ३ जणाची  वन कोठडीत रवानगी करण्यात आली.

नवीन तोतलाडोह, डोंगरतला गावातील ते राहणारे होते. त्यांना अटक करण्यात आल्याचे कळताच मोठय़ा संख्येने गावकरी गोळा झाले. त्यांनी ही कारवाई करू नये म्हणून वनाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक निनू सोमराज, सहाय्यक वनसंरक्षक भागवत या प्रकरणात लक्ष ठेवून आहेत. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचेही सहकार्य लाभत आहे.

विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान सातत्याने या परिसरात गस्त घालत असतात. निसर्गाच्या संवर्धनासाठी पेंचची चमू कार्यरत आहे. ही कारवाई म्हणजे नियोजनपूर्वक गस्त आणि व्याघ्र संरक्षण डाळ, वन्यजीव विभाग यांच्यातील सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे.  – रविकिरण गोवेकर, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

First Published on May 7, 2018 12:40 am

Web Title: loksatta crime news 65