News Flash

राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख

"नवी घडी बसण्यास सुरुवात होते तेव्हा अनेक सोंगट्यांची जागा बदलते. अनेकांना जागा करुन द्यावी लागेत. त्यामुळे..."

Uddhav Thackeray, Sharad Pawar and Mallikarjun Kharge (Express photo by Prashant Nadka)

सध्या राज्यात सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार हे परिस्थितीमुळे निर्माण झालेलं सरकार असल्याचं मत अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीत सर्व १६२ लोकप्रितिनिधींनी निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमधून एकत्र येण्याचा पर्याय स्वीकारल्याने एकादा पक्ष नाराज असल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होऊ शकतात, असं म्हटलं आहे.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच, तुमचं आणि तुमच्या पक्षाचं सध्या नेमकं चाललंय काय? असा प्रश्न अमित देखमुख यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अमित यांनी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीसंदर्भात काही सांगण्याची गरज नाही, मागील अनेक वर्षांपासून आपण पक्षाचं काम पाहत आलेलो आहोत असं म्हणलं. तसेच सध्या आम्ही राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका बजावतोय. तर महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीत सत्तेत आहोत. देशात आम्ही विरोधी पक्षात तर राज्यात सत्ताधारी पक्षात आहोत. सध्या आमची हीच भूमिका आहे असं अमित यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपलं आहे ही भावना दाखवण्यात काँग्रेस नेते कमी पडतात का?, या प्रश्नाचंही अमित यांनी उत्तर दिलं. मला क्षणभरासाठीही वाटत नाही की हे सरकार आपलं नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमाचा स्वीकार करुन सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. निवडणुकानंतर जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला, असं अमित यांनी सांगितलं. आम्ही सरकारमध्ये आहोत आणि किमान समान कार्यक्रमाअंतर्गत काम करतोय. आव्हान पेलत, समतोल राखत सरकार जनतेच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतोय असंही अमित म्हणाले.

नक्की वाचा >> भविष्यात काँग्रेसला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येणार; अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास

काँग्रेस नेते वेगवेगळं बोलत असतात. विसंवाद दिसतोय आम्हाला काय किंमत आहे सगळं शिवसेना किंवा राष्ट्रवादी चालवते असं अनेकजण ऑफ रेकॉर्ड बोलतात. हे चुकीचं चाललं आहे असं नाही का वाटतं तुम्हाला या प्रश्नावर अमित यांनी सरकार निर्माण कशा परिस्थितीमध्ये झालं यासंदर्भात भाष्य केलं. “तुम्ही म्हणताय तसं काही प्रमाणात वस्तूस्थितीला धरुन असेल पण हे विसरुन चालणार नाही की हा पर्याय महाराष्ट्रासमोर का आला हे लक्षात घ्यायला पाहिजे. हा पर्याय लोकप्रितिनिधिंनी स्वीकारला. हा काही नैसर्गिक पर्याय नव्हता. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये १६२ लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यांनी हा पर्याय स्वीकारला. मतमतांतरे असू शकतात. तुम्ही म्हणताय तसं काँग्रेस नाही तर सत्तेतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही कुजबूज असावी. नवी घडी बसण्यास सुरुवात होते तेव्हा अनेक सोंगट्यांची जागा बदलते. अनेकांना जागा करुन द्यावी लागेत. त्यामुळे अशा चर्चा होतात. या ज्या गोष्टी, भावना आहेत त्याची पक्ष म्हणून आम्ही नोंद घेतोय. तक्रारी सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असं अमित यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 6:04 pm

Web Title: loksatta drusthi ani kon with congress leader amit deshmukh he talks about congress in maha vikas aghadi scsg 91
Next Stories
1 राज्यात अनलॉकची सुरुवात: जाणून घ्या कोणत्या टप्प्यात काय सुरु आणि काय बंद राहणार!
2 Video : ‘दृष्टी’ आणि ‘कोन’मध्ये दूरसंवादमालेत अमित देशमुख यांच्याशी संवाद
3 रुग्णांवर चाचणी करण्यास परवानगी देऊ शकत नाही; ‘पीएम केअर्स’मधील व्हेंटिलेटर्सवरून उच्च न्यायालयाने फटकारलं
Just Now!
X