निवडणुका आल्या की, पक्षांतराची लाट येते. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००९मधील विधानसभा निवडणुकीवेळचा असाच एक किस्सा लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात सांगितला. भाजपाचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आमदार अतुल भातखळकरांविषयी राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला. आमदार अतुल भातखळकर हे माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितलं होतं,” असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती आणि भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबिनारमध्ये महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी संवाद साधला. राजकीय नेत्याचं एक स्वप्न असतं. त्यासाठी माणसं लागतात. पण तुमच्याबरोबरची माणसं सोडून जातात आणि आरोपही होतो, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले. “जे सोडून गेले, त्यांची एक दिवसांची बातमी होते. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल वाईटही वाटतं. माझ्यासाठी आले, पण स्थानिक गोष्टींसाठी सोडून गेले. सुरूवातीच्या काळात माणसं सोडून गेली नाहीत, असा एकतरी राजकीय पक्ष आहे का? शिवसेना असो, भाजपा असो कुणीही,” असं राज म्हणाले.

मला पण हाच प्रश्न पडलाय; राज ठाकरेंनी जनतेच्या उदासिनतेबद्दल व्यक्त केली नाराजी

“मी तुम्हाला २००९ मधील विधानसभा निवडणुकीतील गोष्ट सांगतो. भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे विधानसभेचं तिकीट मागायला आले होते. भाजपाचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकीटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितलं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना अजून दोन माणसं तिथे होती. त्यांच्यासमोर सांगितलं. साक्षीदार म्हणून त्यांना उभं करू शकतो. हे असं घडतं असतं. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले. सोडून जातात तेव्हा ते एकटे असतात. जे सोडून गेले त्यांच्याबरोबर माझा महाराष्ट्र सैनिक नाही गेला,” असं राज ठाकरे म्हणाले.