शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येतील का? असा प्रश्न कायमचं महाराष्ट्राच्या मनाला खुणावत राहिला आहे. अनेकवेळा शिवसेना-मनसे एकत्र येणार यांच्या बातम्याही आल्या. अनेकवेळा दोन्ही भाऊ एकत्रही दिसले. पण, राजकारणात दोघांनीही स्वतंत्र अस्तित्व जपण्यालाच प्राधान्य दिलं. त्यामुळे हा प्रश्न सातत्याने अनुत्तरितच राहिला आहे. राज-उद्धव एकत्र येणार का? असा प्रश्न ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीवेळी राज यांना करण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी आभाळाकडे हात दाखवत उत्तर दिलं.

भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते; राज यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती आणि भविष्यवेधातील राजकारण याचा वेध घेणारी ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही वेबमाला ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. या वेबिनारमध्ये आज (१ जून) महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केला. त्यावर राज यांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत “परमेश्वरालाच ठाऊक” असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा प्रश्न गिरीश कुबेर यांनी केला. तेव्हा, “म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो,” असं उत्तर राज यांनी दिलं.

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम करूनही नशिबी काय आलं… पराभवच! -राज ठाकरे

भविष्यात मनसेच्या राजकीय वाटचालीबद्दलही राज यांनी भूमिका मांडली. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कुणाशी युती होईल का? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर “निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकींसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल”, असं त्यांनी स्पष्ट केलं. “करोना आजार आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला, तरच निवडणुका घेण्याला अर्थ आहे. समाजाचं मन स्थिर होणं महत्वाचं आहे. हा समाज स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा,” असं कळकळीचं आवाहनही राज यांनी केलं.