News Flash

स्वबळावर लढल्यास भाजप-शिवसेनेचे नुकसानच!

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट प्रतिपादन

स्वबळावर लढल्यास भाजप-शिवसेनेचे नुकसानच!
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट प्रतिपादन

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढविणार असतील आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेना स्वबळावर लढणार असतील तर भाजप-शिवसेनेचे नुकसानच होईल अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या अपरिहार्यतेकडे लक्ष वेधले. दोन्ही पक्षांकडून कार्यकत्यांचे आत्मबळ वाढविण्यासाठी स्वबळाचे नारे सातत्याने दिले जात असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र राजकीय वास्तव स्पष्टपणे मांडले.‘ लोकसत्ता’ नागपूर कार्यालयाला शनिवारी दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते.

या वेळी संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. आगामी निवडणुंकामध्ये शिवसेनेशी युती होण्याची खात्री आहे का, या थेट प्रश्नावर ते म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी युती व्हायला हवी. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत असतील तर युती होणे दोघांच्याही राजकीय हिताचे ठरेल. स्वबळावर लढण्याचा दोघांनाही कमी-अधिक प्रमाणात फटका बसेल.

पुन्हा सत्ता आल्यावर मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार की केंद्रात जाण्याला प्राधान्य द्याल, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘याबाबत पक्षाचा निर्णय शिरसावंद्य असेल.’ २०१९ नंतर तुम्ही विदर्भाचे मुख्यमंत्री असाल की महाराष्ट्राचे हा प्रश्न टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, असे प्रश्न माध्यमांकडचे प्रश्न संपल्यावरच विचारले जातात.

गेल्या सरकारने जे केले नाही ते आम्ही केले हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास, सिंचन प्रकल्पाची उदाहरणे दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून राज्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र पाच वर्षे हा पुरेसा काळ नाही. आणखी बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी वेळ लागेल. हमीभावाने शेतमालाची खरेदी हा सरकारपुढील प्रश्न नाही तर शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे हा खरा प्रश्न आहे. उदाहरणादाखल तुरीचा प्रश्न घेता येईल. यंदा आपल्याकडे तुरीचे प्रचंड उत्पादन झाले. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीला सध्या मागणी नाही. त्यामुळे तूर कोणत्या बाजारपेठेत विकायची हा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतमाल खरेदीबाबतच्या कायद्याला व्यापाऱ्यांनी केलेला विरोध अनाठायी आहे. मुळात हा कायदा हमीभावाबाबत (एमएसपी) नाहीच. तर तो स्टॅचुटरी मिनिमम प्राईससाठी (एसएमपी) आहे. बाजार समिती कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार, राज्य सरकारला काही (ज्याचे हमी भाव केंद्र सरकार ठरवत नाही असे पीक) शेतमालाचे भाव ठरवण्याचे अधिकार आहेत. त्याबाबत राज्याने ठरवलेल्या दराने व्यापाऱ्यांना खरेदी करायची आहे. मात्र याबाबत व्यापऱ्यांमध्ये संभ्रम आहे. केंद्राने निर्यात धोरणात बदल केल्याने शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल, डिझेल जीएसटीत हवे

केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर पेट्रोलवर कर आकारणीतून उत्पन्न मिळवण्याचा एकमेव सोपा मार्ग राज्यांक डे उरला आहे. त्यामुळे पेट्रोलवर मोठय़ा प्रमाणात कर आकारला जात आहे. एकदा का पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीत झाला की हा प्रकार थांबेल. सहज महसूलप्राप्तीचा हा दोर एकदा कापलेलाच बरा, त्यामुळे राज्य सरकारांना इतर पर्याय शोधता येतील. महाराष्ट्राने पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीत करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

विकास प्रकल्पांचा भार नाही

राज्यात सध्या दोन लाख कोटींची अर्थसंकल्पाबाह्य़ (ऑफ बजेट) विकासकामे  सुरू आहेत. तिजोरीतील पैसा जेथे गुंतवणूकदार मिळत नाहीत, अशा ग्रामीण, अविकसित भागांत खर्च करायचा आणि शहरी भागातील कामांसाठी बाहेरून पैसा उभा करायचा हे आमचे धोरण आहे. यात गेल्या चार वर्षांत तरी आम्हाला यश मिळाले आहे. राज्यातील अनेक मोठय़ा पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तिजोरीला हात लावलेला नाही. कर्जरोखे उभारणीतून निधी जमवला आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गासाठीही अशाच पद्धतीने कर्ज रोख्यातून निधी उभारला आहे. जागतिक बँकेने एका अहवालात अर्थसंकल्पबाह्य़ प्रकल्पांसाठी ५० टक्के निधी महाराष्ट्रात गुंतवल्याचे म्हटले आहे. राज्यावरील कर्जही निर्धारित मर्यादेपेक्षा कमी आहे. सकल उत्पन्नाच्या २५ टक्केपर्यंत कर्ज घेता येते. मागील सरकारच्या काळात हे प्रमाण १९ टक्के होते. त्यात कपात करण्यात आम्ही लक्षणीय यश मिळवले आहे.

मिलिंद नार्वेकरांना ‘कमळ’द्या

गणपती उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच शिवसेना नेते मििलद नार्वेकर, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी भेट दिली. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या राजकीय गणेशदर्शनाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी यात राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. नार्वेकर दर वर्षी गणपतीला बोलवतात. यंदा ते नवीन घरी गेले. त्यामुळे त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर कृपाशंकर सिंह राहतात. त्यांनी बोलावल्याने तेथे गेलो. तेथे त्यांनी मला शाल आणि कमळाचे फूल दिले. ते नार्वेकरांना द्या, असे मी सांगितले. जयदत्त क्षीरसागर हे बीडच्या प्रश्नासंबधी वर्षांवर भेटायला आले होते. त्या वेळी घरी आरती सुरू होती म्हणून त्यांना बोलवून घेतले. आता याचा कुणी सोयीचा राजकीय अर्थ काढत असेल तर ते माझ्या हातात नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी हसत-हसत सांगितले.

स्वतंत्र लढूनही भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली सांगली महापालिका जिंकली. असे असले तरी भाजप-शिवसेनेचे राजकीय विचार, धोरण आणि मतपेटी एकच आहे. दोघांनाही एकत्रित मते देणारा एक मोठा वर्ग आहे. स्वतंत्र लढल्याने त्यात फूट पडेल.    – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2018 1:45 am

Web Title: loksatta interview with chief minister of maharashtra devendra fadnavis 2
Next Stories
1 भरधाव ट्रकची विद्यार्थिनींना धडक, एक ठार
2 नागपूर: भिवापूरमध्ये ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, संतप्त जमावाने केली तोडफोड
3 युद्धविमाने किमान रंगवा तरी..
Just Now!
X