उत्तम आशयाला परिणामकारक सादरीकरणाची जोड देत देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाने रत्नागिरी विभागातून लोकसत्ता लोकांकिका राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेच्या महाअंतिम फेरीत धडक मारली आहे. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात गुरुवारी झालेल्या विभागीय अंतिम फेरीत केळकर महाविद्यालयाच्या ‘फुगडी’ या एकांकिकेने पहिला, चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाच्या ‘बंद आहे’ या एकांकिकेने दुसरा, तर कुडाळच्या बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ‘तुमच्या मायला, तुमच्या’ या एकांकिकेने तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेची महाअंतिम फेरी आज शनिवार, १५ डिसेंबर रोजी मुंबईत होत आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यंमधील महाविद्यालयांचे संघ गेल्या ४ डिसेंबर रोजी झालेल्या रत्नागिरी विभागीय प्राथमिक फेरीमध्ये सहभागी झाले. त्यातून विभागीय अंतिम फेरीसाठी स. ह. केळकर महाविद्यालय (देवगड, जि. सिंधुदुर्ग) एकांकिका – ‘फुगडी’, बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, कुडाळ (सिंधुदुर्ग) एकांकिका- ‘तुमच्या मायला, तुमच्या’, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी, एकांकिका-‘नमन’, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण (रत्नागिरी) एकांकिका – ‘बंद आहे’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, (जि. रायगड) एकांकिका ‘शब्द’ या पाच महाविद्यालयीन संघांची निवड करण्यात आली. त्यामध्ये केळकर महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारली.
दुष्काळामुळे गांजलेल्या अंबु या महिलेने निसर्ग आणि समाजातील दुष्ट प्रवृत्तींशी दिलेला एकाकी लढा ‘फुगडी’मध्ये वारकरी संप्रदायातील परंपरेच्या पाश्र्वभूमीवर अतिशय परिणामकारक पद्धतीने सादर करण्यात आला आहे.
स्पध्रेचे परीक्षक गिरीश पतके, विश्वास सोहनी आणि लोकसत्ताचे वितरण उपव्यवस्थापक सुरेश बोडस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी या महाविद्यालयांचे कलाकार आणि पाठीराख्यांनी नाटय़गृह अक्षरश: दणाणून सोडले.
या स्पध्रेबद्दल अभिप्राय नोंदवताना परीक्षक पतके म्हणाले की, राज्यातील महाविद्यालयीन तरुणांचे नाटय़गुण विकसित करणारे हे व्यासपीठ आहे. महाविद्यालयीन कलाकारांनी त्याचा वापर करताना केवळ पुरस्कारासाठी या स्पध्रेत सहभागी न होता आपली एकूणच नाटय़जाणीव विकसित होईल, याकडे लक्ष देणे, स्वत:तील बलस्थाने ओळखून त्याला पैलू पाडण्याची गरज आहे. त्या दृष्टीने या स्पध्रेबरोबरच नाटकाला पूरक अशा विविध कार्यशाळांचेही आयोजन केल्यास स्पध्रेच्या निमित्ताने निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलाजाणिवांचा पाया पक्का होण्यास मदत होईल.
प्रायोजक
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून, ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 12:50 am