News Flash

रत्नागिरीमधून ‘वन डे सेलिब्रेशन’ची निवड

स्पर्धेतील एकांकिकांचे विषय वेगळे होते. पण त्यांच्या लेखन आणि मांडणीमध्ये एकसंधतेचा अभाव होता.

रत्नागिरी : उत्तम आशयाला परिणामकारक सादरीकरणाची जोड देत येथील एस. पी. हेगशेटय़े महाविद्यालयाने रत्नागिरी विभागातून ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत धडक मारली आहे.

गुरुवारी झालेल्या विभागीय अंतिम फेरीत हेगशेटय़े महाविद्यालयाच्या ‘वन डे सेलिब्रेशन’ या एकांकिकेने पहिला, रत्नागिरीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘गावपळण’ या एकांकिकेने दुसरा, तर देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘हरवतंय काही तरी’ या एकांकिकेने तिसरा क्रमांक मिळवला. सर्वोत्कृष्ट एकांकिकेबरोबरच ‘वन डे सेलिब्रेशन’ने लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत यासाठीची वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांमधील महाविद्यालयांचे संघ गेल्या ७ डिसेंबर रोजी झालेल्या रत्नागिरी विभागीय प्राथमिक फेरीमध्ये सहभागी झाले. त्यातून विभागीय अंतिम फेरीसाठी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी (‘गावपळण’), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (‘ऑफबीट’), स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड, जि. सिंधुदुर्ग (‘हरवतंय काही तरी’), एस. पी. हेगशेटय़े महाविद्यालय, रत्नागिरी (‘वन डे सेलिब्रेशन’)  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, जि. रायगड (‘निबंध’) या पाच महाविद्यालयीन संघांची निवड करण्यात आली. त्यामध्ये हेगशेटय़े महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारली.

आपला एकुलता एक मुलगा ‘गे’(समलिंगी) आहे, हे कळल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत एका मध्यमवर्गीय जोडप्याने त्या मुलासह वास्तवाचा केलेला सकारात्मक स्वीकार ‘वन डे सेलिब्रेशन’मधून परिणामकारक पद्धतीने सादर करण्यात आला.

स्पर्धेतील एकांकिकांचे विषय वेगळे होते. पण त्यांच्या लेखन आणि मांडणीमध्ये एकसंधतेचा अभाव होता. ही पिढी तुकडय़ातुकडय़ाने विचार करते, असं त्यातून जाणवतं. एखाद्या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमताही कमी होत चालली आहे. त्यामुळे एकांकिकांमधली दृष्यंही त्रोटक होतात. यामध्ये सुधारणा होण्यासाठी या पिढीने भरपूर वाचणं गरजेचं आहे. मोबाइलच्या अधीन होऊन बघण्यापेक्षा वाचणं महत्त्वाचं आहे. लेखनावरील हिंदी भाषेचा प्रभावही खटकणारा आहे.

– संजय मोने

सर्वच संघांनी चांगला प्रयत्न केला. त्यांनी निवडलेले विषयही वेगवेगळे होते. पण एकांकिकेचे लेखन करताना विचाराचं भान ठेवणं आवश्यक आहे. तसंच परिणामकारक सादरीकरणासाठी भरपूर मेहनत घेणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात अशा स्पर्धामधून तांत्रिक बाजूवर बराच भर दिला जातो. पण ते करत असताना आशयाकडेही लक्ष देणं आवश्यक आहे.

-अजित भुरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 2:54 am

Web Title: loksatta lokankika 2019 one day celebration selection from ratnagiri zws 70
Next Stories
1 कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या गैरवापरामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात – रामतीर्थकर
2 पर्सेसिन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील वादाचे लोण आता रायगडमध्येही
3 पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
Just Now!
X