News Flash

रत्नागिरीत लोकांकिका उत्साहात

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्हय़ांमधून दहा महाविद्यालयांच्या संघांनी स्पध्रेत भाग घेतला.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्हय़ांमधून दहा महाविद्यालयांच्या संघांनी स्पध्रेत भाग घेतला. येथील पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात दिवसभर चाललेल्या स्पध्रेला महाविद्यालयीन युवक-युवतींचा उदंड उत्साहात उत्तम प्रतिसाद लाभला. अंधश्रद्धा, माणसाला असलेली पूर्णत्वाची ओढ, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कलासक्त माणसाच्या वैयक्तिक जीवनातील तणाव इत्यादी विषय या एकांकिकांमधून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच त्या संदर्भात सामाजिक संदेशही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या कलाकारांनी मनापासून प्रयत्न केला.

रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर आणि कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानचे विश्वस्त वामन पंडित यांनी या फेरीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच स्पध्रेतील प्रतिभावान तरुणांना व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रात संधी देण्याच्या हेतूने आयरिस प्रॉडक्शनचे मनीष दळवी आणि अजिंक्य जोशी हेही या फेरीसाठी उपस्थित होते. या स्पध्रेची विभागीय अंतिम फेरी कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाटय़ मंदिरात रंगणार आहे.

अनौपचारिक संवाद

अशा स्वरूपाच्या कोणत्याही स्पध्रेचे परीक्षक सर्वसाधारणपणे काहीही न बोलता केवळ स्पध्रेतील एकांकिकांचे व कलाकारांचे मूल्यमापन करून आपला निकाल संयोजकांना सादर करतात; पण स्पध्रेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक अनिल दांडेकर आणि वामन पंडित यांनी प्रत्येक संघाच्या सादरीकरणानंतर कलाकार आणि दिग्दर्शकांशी अतिशय अनौपचारिक पद्धतीने संवाद साधत संबंधित एकांकिकांच्या गुण-दोषांची मनमोकळेपणाने चर्चा केली. स्पध्रेतील सहभागी कलाकारांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

नगरमध्ये जल्लोष

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची नगर केंद्रावरील प्राथमिक फेरी शुक्रवारी जल्लोषात पार पडली. यातून नगर केंद्राच्या विभागीय अंतिम फेरीसाठी पाच लोकांकिका निवडण्यात आल्या. येत्या ९ तारखेला माऊली नाटय़ संकुलात ही विभागीय अंतिम फेरी होणार आहे. सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष शाम शिंदे व राहुरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र क्षीरसागर यांनी या प्राथमिक फेरीस परीक्षक म्हणून काम पाहिले. या फेरीत एकूण नऊ लोकांकिका सादर झाल्या. या वेळी ‘लोकसत्ता’चे मुख्य व्यवस्थापक (वितरण) मुकुंद कानिटकर, सहायक व्यवस्थापक संतोष बडवे आदी या वेळी उपस्थित होते.

नागपूरमध्ये वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी

‘तिरपुडे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ने ‘सी तारे मूनवर’ या नाटकातून पोलीस खात्याचा विषय हाताळला, तर चंद्रपूरच्या ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’ने युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ‘व्यसन झालं फॅशन’ या नाटकातून समोर मांडली. नक्षलवादासारखा ज्वलंत विषय, ज्याला आवर घालणे अजूनही कठीण होत चालले आहे, तो विषयसुद्धा विद्यार्थी कलावंतांनी उत्तम रीतीने हाताळत परीक्षकांच्या टाळ्या घेतल्या. शुक्रवारी सादर झालेल्या आठ एकांकिकांपैकी विठ्ठलराव खोब्रागडे, आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज नागपूरच्या ‘विश्वनटी’ या एकांकिकेने अवघे सभागृह स्तब्ध केले. विषय समाजाशी आणि समाजातील समस्येशी निगडित असला तरीही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सादरीकरण केले. वेश्यांच्या मुलींनाही शिकण्याचा अधिकार असतो आणि त्यावरून निर्माण झालेली गुंतागुंत ज्या पद्धतीने मांडली, ती खिळवून ठेवणारी होती. महालमधील दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूर आणि इतर शहरांतील महाविद्यालयीन युवक-युवती या नाटय़जागरासाठी सहभागी झाले. नरेश गडेकर व श्रीदेवी प्रकाश देवा यांनी परीक्षण केले. या स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असलेल्या ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या अभिजित गुरू व समिधा गुरू यांनी विद्यार्थ्यांना अभिनयातले बारकावे समजावून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 2:29 am

Web Title: loksatta lokankika enthusiasm in ratnagiri
टॅग : Loksatta Lokankika
Next Stories
1 चंद्रपूरचा विस्तारित प्रकल्प मार्चमध्ये पूर्ण करणार ; ऊर्जा मंत्रालयाचा निर्णय
2 आंबा, काजूभरपाईसाठी हमीपत्राचा पर्याय मुख्यमंत्र्यांना मान्य!
3 पावसाचे ‘कमबॅक’; कोकण, औरंगाबादमध्ये मुसळधार
Just Now!
X