महाविद्यालयीन युवावर्गाच्या कलेला स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेचा नाटय़जागर आज (६ डिसेंबर) घुमणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित या पहिल्याच राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेतील कोकण विभागीय प्राथमिक फेरी आज (६ डिसेंबर) येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये होणार आहे. या स्पध्रेला झी मराठी वाहिनी माध्यम प्रायोजक असून अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगली जिल्’ाातील दहा महाविद्यालयांचे संघ त्यामध्ये सहभागी झाले आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी), नवनिर्माण महाविद्यालय (रत्नागिरी), बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (महाड), कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), डीबीजे महाविद्यालय (चिपळूण), एस. एच. केळकर महाविद्यालय (देवगड), चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली), आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (लांजा), डी. जे. सामंत महाविद्यालय (पाली) आणि आर. व्ही. कुलकर्णी महाविद्यालय (रत्नागिरी) या महाविद्यालयांचा त्यांमध्ये समावेश आहे. येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये आज सकाळी साडेनऊ वाजता या स्पध्रेचा प्रारंभ होणार असून दुपारी २ ते ३ हा भोजनाचा कालावधी वगळता दिवसभर स्पध्रेतील एकांकिका सादर होणार आहेत. अनिल दांडेकर आणि लक्ष्मीकांत भाटकर या प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या फेरीतील पाच एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे. ही फेरी येत्या १० डिसेंबर रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात रंगणार आहे. त्यामध्ये निवडण्यात येणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या संघाला मुंबईत आयोजित राज्यस्तरीय अंतिम फेरीत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.