दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ाला एकूणच मरगळ आली असली, तरी शहरी व ग्रामीण भागातील महाविद्यालयीन नाटय़कर्मीचा उत्साह मात्र दांडगा असल्याचा प्रत्यय शनिवारी येथे आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थितांनी अनुभवला. ग्रामीण भागातील समस्यांचा मागोवा घेणाऱ्या काही ताकदीच्या संहिता व शहरी भागातील संवेदना टिपणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. पहिल्या दिवशी सोळापैकी ७ एकांकिकांनी स्वामी रामानंदतीर्थ सभागृहात प्रेक्षकांना जिंकून घेतले. उद्या (रविवारी) ९ एकांकिका सादर होणार आहेत.
औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्य़ांतील महाविद्यालयीन नाटय़कर्मी सकाळी शहरात दाखल झाले, तेच एकांकिका ताकदीने सादर करण्याची ऊर्मी घेऊन. नावनोंदणीनंतर प्रसिद्ध नाटय़कर्मी अमेय उज्ज्वल व प्रा. योगिता महाजन या परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. औरंगाबादच्या सरस्वती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने ज्ञानेश्वर लोखंडेलिखित ‘रंग धुंद’ ही एकांकिका सादर करण्यात आली. त्यानंतर बीड येथील बलभीम महाविद्यालयाची अमर नखातेलिखित ‘१४ फेब्रुवारी’, देवगिरी महाविद्यालयाची अनिलकुमार साळवेलिखित ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’, जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची संजय टकारियालिखित ‘एक गाव’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अभिजित दळवीलिखित ‘झाला सोहळा अनुपम’, औरंगाबादच्या सभू कला महाविद्यालयाची संजय गायकवाडलिखित ‘काळगर्भ’ आणि औरंगाबाद येथील अमोल जाधव लिखित ‘सारेगम’ या एकांकिका सादर करण्यात आल्या.
सामाजिक प्रश्नांना भिडताना तरुणाईने दाखवलेली संवेदनशीलता प्रेक्षकांना भावली. ‘आयरीस’ या माध्यम संस्थेचे अभय परळकर, ‘लोकसत्ता’चे मुख्य व्यवस्थापक मुकुंद कानिटकर आदींची या वेळी उपस्थिती होती.