महाविद्यालयीन रंगकर्मी आणि नाशिककर नाटय़प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झालेल्या ‘लोकसत्ता-लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी येथील महाकवी कालिदास कलामंदिर सज्ज झाले असून सोमवारी दुपारी चार वाजता या फेरीचा पडदा उघडला जाणार आहे.
सुमारे महिनाभरापासून महाविद्यालयीन रंगकर्मीची उत्सुकता ताणलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक केंद्रातील प्राथमिक फेरीतून पाच एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. विशेष म्हणजे, स्पर्धेत शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांतील महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.  प्राथमिक फेरीतून नाशिक विभागीय अंतिम फेरीसाठी पाठवण (हं.प्रा.ठा. महाविद्यालय) इटर्नल ट्रथ (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक), खरा जाणता राजा (दांडेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर), हे राम (क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्स महाविद्यालय, नाशिक), तहान (हिरे महाविद्यालय, पंचवटी) यांची निवड झाली आहे. या पाच एकांकिकांमधून राज्यस्तरासाठी कोण पात्र होईल, याची नाटय़प्रेमींमध्ये उत्सुकता आहे.  परीक्षक म्हणून नाटय़जगतातील सर्वाना परिचित असलेले अभिराम भडकमकर यांच्यासह नाशिकचे चारुदत्त कुलकर्णी, दत्ता पाटील हे काम पाहणार आहेत.