‘लोकसत्ता’मधील वृत्तानंतर रेल्वे प्रशासनाकडून दखल

डहाणू : मुंबई-वडोदरा मालवाहतूकीच्या स्वतंत्र मार्गिकेच्या रुळांसाठी वाणगावनजीक कापशी दरम्यान राखेचा भराव टाकण्यात आला होता. याला ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यानंतर तो काढून टाकण्यास सुरुवात करण्यात आली. ही घातक राख  बंधारा, नाले आणि खाडीच्या मुखाशी साठून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांत मिसळण्याची भीती व्यक्त केली जात होती.

याशिवाय त्याचा परिणाम पारंपरिक  मासेमारी आणि शेतीवर होण्याचा धोका होता. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रशानसनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली होती. याविषयीची वृत्त ‘लोकसत्ता’च्या गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध  झाली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रशासनाने रुळांवर टाकण्यात आलेला  भराव काढून तो इतरत्र नेण्यात येत असल्याचे स्थानिकांनी दिली.

डहाणू औष्णिक प्रकल्पातून ट्रकमधून आसनगाव, वानगाव कापशी या मार्गावर तसेच डहाणू चारोटी मार्गे जाताना  प्रचंड प्रमाणात राख उडून नागरिकाना या बाबत प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. घातक राखेमुळे  श्वसनाचे आजार तसेच फुफ्फुस आणि डोळ्याचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात होती.

लोकशक्तीचा विजय

मुंबई वडोदरा रेल्वे कॉरिडोरसाठी वाणगाव कापशीदरम्यान खाडीत राखेचा भराव टाकण्यात आला होता. आम्ही केलेल्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने  भराव केलेली राख काढण्यास सुरुवात केल्याची माहिती कापशीचे सरपंच बाबू गहला ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.