महाविद्यालयीन युवकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची नगर केंद्रावरील प्राथमिक फेरी उद्या, शनिवारी होणार आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात ही स्पर्धा रंगणार आहे.
‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्याच वर्षी ही स्पर्धा सुरू झाली. पहिल्याच वर्षी स्पर्धेला नगरसह राज्यभरात भरघोस प्रतिसाद लाभला. याही वर्षी नगर केंद्रावर स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी सकाळी १० वाजता हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव सुनील रामदासी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. या फेरीसाठी प्रा. नीलिमा बंडेलू व श्रीराम देशमुख हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेला ‘जनता सहकारी बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’ व ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ व ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. नगरसह मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी व औरंगाबाद अशा आठ केंद्रांवर तीन टप्प्यांत ही स्पर्धा होत आहे. नगर येथील केंद्रावर दि. ३ फेब्रुवारीला अंतिम फेरी होणार असून, त्यातील विजेत्या वक्त्यांची महाअंतिम फेरीसाठी निवड होईल. स्पर्धेची ही महाअंतिम फेरी दि. १४ फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे.
स्पर्धा कुठे?
हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय,
पत्रकार वसाहत चौक, सिव्हिल हॉस्पिटलसमोर, अहमदनगर.