सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे बुलेट ट्रेन पुन्हा चर्चेत आली आहे. उद्धव यांनी फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर यावरुन दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. काहीजणांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी खरोखर या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून पाहण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’नेही जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘बुलेट ट्रेन प्रकल्पाची महाराष्ट्राला आवश्यकता आहे असे वाटते का?’ असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना १७ हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवलं आहे. त्यापैकी ८१ टक्के म्हणजेच १३ हजारहून अधिक जणांनी महाराष्ट्राला बुलेट ट्रेन प्रकल्पाची गरज नसल्याचे मत नोंदवलं आहे.

महाआघाडी सरकार सत्तेत येण्याची चाहूल लागल्यापासूनच बुलेट ट्रेन प्रकल्पाला देण्यात येणारा निधी इतर कामांसाठी वापरण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आणि सोशल नेटवर्किंगवर रंगू लागल्या. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांमध्येच उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं स्पष्ट केलं. जनतेला या प्रकल्पाची खरच गजर आहे की नाही यावरुन चर्चा रंगू लागली. म्हणूनच ‘लोकसत्ता ऑनलाइन’नेही हे जाणून घेण्याचा प्रयत्न फेसबुक आणि ट्विटवरील जनमताच्या माध्यमातून केला. ‘बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, या प्रकल्पाची महाराष्ट्राला आवश्यकता आहे असे वाटते का?,’ असा प्रश्न फेसबुक तसेच ट्विटवर विचारण्यात आला होता.

फेसबुकवरील प्रश्नाला १७ हजार ३०० हून अधिक वाचकांनी आपला प्रतिसाद नोंदवला. त्यापैकी १३ हजार जणांनी नाही असं उत्तर देत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज नाही असं मत नोंदवलं. हा आकडा एकूण मत देणाऱ्या वाचकांच्या संख्येपैकी ८१ टक्के इतका आहे. मत नोंदवणाऱ्या उर्वरित ४ हजार ३०० वाचकांनी म्हणजेच १९ टक्के वाचकांनी होय या प्रकल्पाची राज्याला गरज असल्याचं म्हटलं आहे.

ट्विटरवरही या प्रश्नाला एक हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवलं. त्यापैकी 74 टक्के वाचकांनी या प्रकल्पाची राज्याला गरज नसल्याचं मत व्यक्त केलं. तर २6 टक्के वाचकांनी प्रकल्पाच्या बाजूने मत नोंदवलं.

नक्की काय आहे हा मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

-अहमदाबाद आणि मुंबई शहरादरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आधी २०२२ ठरवण्यात आली होती, पण आता ती २०२३ पर्यंत पुढे गेली आहे.

-या प्रकल्पाचं काम अधिकृतरीत्या सप्टेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आलं.

-सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन आहे. चाचणीवेळी या गाडीने १८० किमी प्रति तासापर्यंतचा वेग गाठला होता. तर जपानमधील बुलेट ट्रेन ३२० किमी प्रति तासापर्यंतच्या वेगानं धावू शकते.

-१,०४९ कोटींहून अधिक रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सूरत, अहमदाबाद आणि मुंबई ही भारतातील महत्त्वाची आर्थिक केंद्र या द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत.

-सध्या या जवळजवळ ५०० किमीच्या प्रवासाला आठ तास लागतात, जो बुलेट ट्रेनमुळे फक्त दोन तास सात मिनिटांत पूर्ण करता येईल.

-आतापर्यंत या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण १,३८० हेक्टर जमिनीपैकी ५४८ हेक्टर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. पालघरमध्ये लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे.