मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग करण्यात आलं असून नेतपदी निवड करण्यात आली. अमित ठाकरे यांच्या रुपाने पक्षात तरुण नेतृत्त्व आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. दुसरीकडे पक्षाचा झेंडाही बदलण्यात आला आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर १४ वर्षांनी पक्षाचा झेंडा बदलण्यात आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये अमित ठाकरे आणि बदललेला झेंडा यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल असं मत वाचकांनी नोंदवलं आहे. फेसबुकवर ५८ टक्के लोकांनी मनसेला याचा फायदा होईल असं सांगितलं आहे.

अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मला आज ठराव मांडला जाणार असल्याची माहिती दिल्याने पायाखालची जमीन सरकली होती असं यावेळी त्यांनी सांगितलं. पक्षाचं १४ वर्षातील हे पहिलं अधिवेशन असून २७ वर्षात पहिल्यांदा स्टेजवर बोलत आहे. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा आहे,” असं अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

मनसेचा झेंडा बदलला
राज ठाकरेंच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

काय आहे वाचकांचा कौल
अमित ठाकरेंचं लाँचिंग आणि बदललेला झेंडा या पार्श्वभुमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरुन अमित ठाकरेंचं लाँचिंग आणि बदललेला झेंडा मनसेसाठी नवसंजीवनी ठरेल असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर ५८ टक्के वाचकांनी म्हणजेच दोन हजार ७०० जणांनी होय असं मत नोंदवलं आहे. तर ४२ टक्के वाचकांनी म्हणजेच एक हजार ९०० जणांनी नाही असं मत नोंदवलं आहे.

ट्विटरवर ५१.२ टक्के प्रेक्षकांनी होय उत्तर दिलं असून ४८.८ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे.

या जनमत चाचणीवरुन अमित ठाकरे आणि नवीन झेंड्यामुळे मनसेत सकारात्मक बदल होतील असा विश्वास लोकांना वाटत आहे. तसंच याचा फायदा पक्षाच्या भविष्यातील वाटचालीत होईल अशीही प्रतिक्रिया मिळत आहे.