महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’नं वाचकांना काय वाटते यासंदर्भात जनमत घेतलं. त्यामध्ये सरासरी ८० टक्के वाचकांनी हा विचार योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असून सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं आणि प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा दुसरा पर्याय असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. तसंच तसंच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.



यावर पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’नं जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य ठरेल, असं वाटतं का? असा प्रश्न ट्विटर आणि फेसबुकवरून विचारण्यात आला होता. या पोलवर ट्विटर आणि फेसबुकवर जवळपास ३८ हजार जणांनी आपलं मत नोंदवलं. त्यापैकी ट्विटरवरील ७८ टक्के आणि फेसबुकवरील ८२ टक्के वाचकांनी हा विचार योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटरवर २ हजार ७०० पेक्षा अधिक तर फेसबुकवर ३६ हजारांपेक्षा अधिक वाचकांनी आपलं मत नोंदवलं. काही जणांनी आम्हाला आमची मुलं महत्त्वाची आहेत, शैक्षणिक वर्ष वाया गेलं तरी चालेल अशी प्रतिक्रिया दिली. तर काही जणांनी आम्ही मुलांना घरी बसवून शिकवू पण इतक्यात शाळांमध्ये पाठवणार नसल्याची भूमिका घेतल्याचीही पाहायला मिळाली