News Flash

मुंबई – नागपूर बुलेट ट्रेनची मुख्यमंत्र्यांची मागणी योग्य की अयोग्य?; वाचक म्हणतात…

राजधानीला आणि उप-राजधानीला जोडाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या विषयावरुनच जनमत चाचणी घेण्यात आली

महाराष्ट्राला बुलेट ट्रेन द्यायचीच असेल तर ती राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारी द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवरुन सामान्य जनतेमध्ये मतमतांतरे असल्याचे ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये दिसून आलं आहे. ‘मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्राने महाराष्ट्राला द्यावा, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी योग्य वाटते का?’, या प्रश्नावर साडेसात हजारहून अधिक वाचकांनी मतं नोंदवलं आहे. या जनमत चाचणीमध्ये ट्विटवरील चार हजार ५८६ वाचकांपैकी ७३ टक्के वाचकांनी मुख्यमंत्र्यांची मागणी योग्य वाटत नसल्याचे म्हटले आहे. तर फेसबुकवर या जनमत चाचणीमध्ये सहभागी झालेल्या तीन हजार वाचकांपैकी ८० टक्के वाचकांनी मुख्यमंत्र्यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे वाचकांमध्येच या विषयावर संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

नक्की वाचा >> “…तर मी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करेन”; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पांसंदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले. “बुलेट ट्रेनची गरज नाही असं आपणही म्हणाला होता, शरद पवारही म्हणाले होते. बुलेट ट्रेनमध्ये आपल्या राज्याला फायदा नसून आपल्या राज्याने यामध्ये गुंतवणूक करणं बरोबर नाही, असं मत मांडण्यात आलं होतं. तरीही ६० टक्के जमीन संपादन आतापर्यंत झालं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय?,” असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला.

राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई- नागपूर अशी बुलेट ट्रेन देण्याची मागणी केंद्राकडे केली. “प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते अनेक बाजू असतात. यामध्ये आपण स्थानिक लोकांचा विचार करणं फार महत्वाचे आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता राज्याला असेल तर माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझ्या राजधानीला आणि उप-राजधानीला जोडाणारी बुलेट ट्रेन द्या. यामुळे विदर्भासंदर्भात कारण नसताना दुरावा निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, ज्याला शिवसेना प्रमुखांचे नाव दिलं गेलं आहे, तशीच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन मला द्या. मला त्याचा खूप आनंद होईल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचप्रमाणे सध्याच्या मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उपयोग नाहीय असं मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> मी घरात बसून राज्यासाठी १६ हजार कोटींची गुंतवणूक आणली : उद्धव ठाकरे

वाचकांचे म्हणणे काय?

‘मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्राने महाराष्ट्राला द्यावा, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी योग्य वाटते का?’ या प्रश्नावर ट्विटरवर चार हजार ५८६ वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ७३.१ टक्के म्हणजेच ती हजार ३५२ वाचकांनी नाही असं मत नोंदवलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांची मागणी योग्य वाटत नसल्याच्या बाजूने या वाचकांनी मत नोंदवलं आहे. तर मुख्यमंत्र्यांची मागणी योग्य असल्याचे वाटणाऱ्या वाचकांची संख्या २६.९ म्हणजेच एक हजार २३४ इतकी आहे.

फेसबुकवर मत नोंदवणाऱ्या तीन हजार वाचकांपैकी ८० टक्के वाचकांनी उद्धव ठाकरेंची मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनची मागणी योग्य असल्याचे मत नोंदवले आहे. तर २० टक्के वाचकांनी या मागणीला विरोध करत ही अयोग्य असल्याचे मत मांडले आहे. म्हणजेच फेसबुकवरील तीन हजारपैकी दोन हजार ३०० वाचकांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने मत नोंदवत मागणी योग्य असल्याचे म्हटलं आहे. तर ६०३ वाचकांनी ही मागणी योग्य नसल्याचे म्हटले आहे.

शिवसेना पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा देणार

बुलेट ट्रेनसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. तसेच मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्प हा राज्यासाठी फारसा उपयोगाचा नसल्याचे मतही उद्धव यांनी मांडले.  “तिचा (मुंबई – सूरत बुलेट ट्रेनचा) सध्या काही उपयोग नाहीय. या प्रकल्पाची सध्या काही आवश्यकता नाहीय. पण भूसंपादन करते वेळी जिथे विरोध झाला आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांच्यामागे शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचं आहे तो निर्णय आपण घेऊच पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्यामागे शिवसेना आहे. आता ज्यांनी स्वत:हून जमीन दिली असेल तो कारभार झाला असेल. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा मुद्दा महत्वाचा आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणार सुद्धा सरकारने करार केला होता. पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाणार प्रकल्पाप्रमाणे आम्ही मुंबई – सूरत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांसोबतही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सरकार म्हणून भूमिका काय? 

बुलेट ट्रेनसंदर्भात सरकार म्हणून भूमिका घेताना सर्व सहकारी पक्षांना विचारात घेण्याची गरज असल्याचे उद्धव यांनी म्हटलं आहे. “आता सरकार म्हणून सर्वांना मान्य असेल तर करु करार. करोनामुळे बुलेट ट्रेनचा विषयच बॅकसीटला गेला आहे. त्यावर कोणी काही विचारलं ही नाही आणि चर्चा ही झाली नाही. आता सरकार म्हणून विचार करताना, माझी स्वत:ची भूमिका जनतेसोबत जाण्याची असेल. मात्र सरकार म्हणून विचार करु तेव्हा यात राज्याचे हीत आहे की नाही याचा विचार करताना सर्वांना एकत्र बोलवून हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 2:03 pm

Web Title: loksatta poll readers have different opinion on uddhav thackerays demand of mumbai nagpur bullet train scsg 91
Next Stories
1 “यांना इतकंही माहिती नाही”; उद्धव ठाकरे, राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर
2 “तुमच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली…”, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
3 पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…
Just Now!
X