ठाकरे सरकारने लॉकडाउन एक्झिट प्लॅनमध्ये जनतेला वाऱ्यावर सोडल्याची मनसे आमदार राजू पाटील यांची टीका योग्यच असल्याचे मत ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या वाचकांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने सोमवारपासून लॉकडाउनचे नियम शिथिल केले असून ‘मिशन बिगीन अगेन’ला सुरुवात झाली आहे. सोमवारीच याचे परिणाम दिसून आले. आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. मात्र बससाठी लांबच लांब रांगा, जागोजागी झालेली वाहतूक कोंडी असं चित्र रस्त्यांवर पहायला मिळालं. याचेच फोटो पोस्ट करुन राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारव निशाणा साधला होता. राजू पाटील यांच्या या टीकेला जनतेनेही ‘मनसे’ पाठिंबा दिल्याचे लोकसत्ता डॉट कॉमने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये दिसून आलं आहे.

लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर मुंबई, डोंबिवलीमध्ये बेस्ट बसेससाठी भल्या मोठया रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळालं. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण-डोंबिवलीमधून मोठ्या संख्येने लोकं मुंबईला कामासाठी येतात. अजून लोकल ट्रेन सुरु झालेली नसल्याने बेस्टच्या बसेसमधून मुंबई गाठण्यासाठी डोंबिवलीमध्ये मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचे फोटो पोस्ट करत पाटील यांनी राज्य सरकारकडे एक्झिट प्लॅन नसून ठाकरे सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे अशी टीका सोशल नेटवर्किंगवरुन केली होती.

पाटील यांच्या या टीकेच्या आधारेच ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने फेसबुक आणि ट्विटवर जनमत जाणून घेतले. ‘ठाकरे सरकारने लॉकडाउन एक्झिट प्लॅनमध्ये जनतेला वाऱ्यावर सोडलं, ही मनसे आमदार राजू पाटील यांची टीका पटते का?’ असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. या जनमत चाचणीमध्ये साडेचार हजारहून अधिक लोकांनी आपलं मत नोंदवलं. फेसबुकवर मत नोंदवणाऱ्यांची संख्या चार हजारहून अधिक आहे. फेसबुकवर मत नोंदवलेल्यांपैकी ६६ टक्के तर ट्विटरवर मत नोंदवलेल्यांपैकी ५८ टक्के वाचकांनी पाटील यांनी मांडलेले मत योग्यच असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकवर एकूण चार हजार १०० वाचकांनी पाटील यांनी केलेली टीका योग्य वाटते की अयोग्य यासंदर्भात आपले मत नोंदवले. त्यापैकी ६६ टक्के म्हणजेच दोन हजार ७०० वाचकांनी ‘होय’ असं मत नोंदवत पाटील यांना पाठिंबा दिला. तर ३४ टक्के म्हणजेच एक हजार ३०० वाचकांनी ‘नाही’ ही टीका पटत नसल्याचे सांगत ठाकरे सरकारच्या बाजूने कौल दिला.

ट्विटरवर या जनमत चाचणीमध्ये अवघे ७६८ लोकांनी सहभाग नोंदवला असला तरी तेथेही पाटील यांच्या भूमिकेला वाचकांनी पाठिंबा दिल्याचेच चित्र दिसलं.

काय म्हणाले होते राजू पाटील?

बससाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि वाहतूक कोंडीचे फोटो पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणमधील आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला प्रश्न विचारला आहे. “तुमचा लॉकडाउनचा एक्झिट प्लान काय ?” असा सवाल राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही” अशी टीका त्यांनी टि्वटरवरुन केली होती. या टि्वटमध्ये त्यांनी महाराष्ट्र सीएमओ, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टॅग केले होते.