राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं आहे. लोकसत्ता ऑनलाइनने फेसबुक आणि ट्विटवर घेतलेल्या जनमत चाचणीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. फेसबुकवर २३ हजारहून अधिक वाचकांनी तर ट्विटवर पाच हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवलं आहे. २४ तासांच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या या जनमत चाचणीमध्ये वाचकांनी सत्तांतरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. असं असलं तरी भाजपा येथे अगदी काठावर पास झाल्याचे चित्र दिसत आहे. २८ हजारहून अधिक वाचकांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये आपले मत नोंदवलं आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तेव्हापासूनच हे सरकार किती दिवस टिकेल यासंदर्भात अनेकदा शंका व्यक्त करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता भाजपाने अनेकदा बोलून दाखवली आहे. मंगळवारी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या या टिकेला चोख प्रतिउत्तर दिलं. “मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,” असं सांगत शरद पवार यांनी थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचं आव्हान भाजपाला केलं आहे. दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या भाजपाला मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये सुनावलं.

पवारांआधी उद्धव आणि फडणवीसांमध्ये जुंपली

‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं होतं. या आव्हानाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. “महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या”, असं फडणवीस म्हणाले होते. यावरुनच आता पवारांनी थेट भाजपाला लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्याचं आव्हान केलं आहे.

राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या या शाब्दिक खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर खरोखरच राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास कोणाच्या पारड्यात महाराष्ट्राची जनता मत टाकेल असा प्रश्न ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने फेसबुक आणि ट्विटवर वाचकांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फेसबुकवर २३ हजार ८०० जणांनी आपलं मत नोंदवलं तर ट्विटवर पाच हजार ३२० जणांनी आपलं मत नोंदवलं.

भाजपा काठावर पास

फेसबुकवरील निकाल म्हणतो…

‘राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास फायदा कोणाचा? तुम्हाला काय वाटतं?,’ असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला ‘महाविकास आघाडी’ आणि ‘भाजपा’ असे पर्याय देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचे सरकार सत्तेत येणार याबद्दल महिनाभराहून अधिक काळ गोंधळ सुरु होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. असं असलं तरी अद्यापही महाराष्ट्रातील मतदार गोंधळलेल्या स्थितीमध्ये असल्याचे ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीतून दिसून आलं आहे. कारण फेसबुकवरील २३ हजार ८०० पैकी ५०.४ टक्के वाचकांनी म्हणजेच १२ हजार वाचकांनी तर ‘भाजपा’ असे उत्तर दिलं आहे. ११ हजार ५०० हून अधिक जणांनी ‘महाविकास आघाडी’ला फायदा होईल असं मत व्यक्त केलं आहे.

ट्विटवरील वाचकांचे म्हणणं काय?

‘राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास फायदा कोणाचा? तुम्हाला काय वाटतं?,’ या प्रश्नावर ट्विटवरील पाच हजार ३२० जणांनी आपले मत नोंदवलं आहे. त्यापैकी ५०.५ टक्के म्हणजेच २६६० हून अधिक वाचकांनी ‘भाजपा’ असे उत्तर दिलं आहे. तर ४९.५ टक्के वाचकांनी ‘महाविकास’ आघाडी हा पर्याय निवडला आहे. म्हणजेच फेसबुकप्रमाणे येथेही अगदी अटीतटीची लढाई पहायला मिळत आहे.

अनेक वाचकांनी या जनमत चाचणीच्या पोस्टवर आपली मतेही नोंदवली आहेत.


एकंदरितच महाविकास आघाडी आणि भाजपाच्या नेत्यांकडून छातीठोकपणे मध्यावधी निवडणुका घेण्याची भाषा केली जात असली तरी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमधून कोणत्याच पक्षासाठी या निवडणुका वाटतात तितक्या सोप्या असणारा नाही हे स्पष्ट होत आहे.