News Flash

पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

मद्यपी टोळक्यांकडून नागरिकांना त्रास; पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ

लोणावळा : वर्षांविहारासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत असून हुल्लडबाजीच्या घटना वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणावळा शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी मुंबई-पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळ्यात येतात. शनिवार आणि रविवार या दिवशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ होते.

पर्यटक मोटारीतून लोणावळा तसेच खंडाळा परिसरात येतात. त्यामुळे आठवडय़ातून दोन दिवस शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लोणावळा शहरात कोंडी होते. कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिक त्रासून जातात. मुसळधार पावसात पोलिसांना रात्री उशिरापर्यंत वाहतुकीचे नियोजन करावे लागते. मोठय़ा संख्येने वाहने लोणावळ्यात येत असल्याने नियोजन करणाऱ्या पोलिसांची धावपळ उडते. अनेक पर्यटक पोलिसांच्या सूचनांकडे काणाडोळा करतात. पोलिसांनी सूचना दिल्यानंतर त्यांच्याशी वाद घालतात. अशा प्रकारच्या घटना लोणावळ्यात नित्याच्या झाल्या आहेत.लोणावळा शहरातील पायाभूत सुविधांवर पडणारा ताण विचारात घेऊन पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहेत. गैरप्रकार करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई तसेच समज देणाऱ्या पोलिसांबरोबर अरेरावी केली जाते. काही युवक मद्याच्या अमलाखाली थेट पोलिसांवर हात उचलतात, अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.

हुल्लडबाजीचा सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांना त्रास

लोणावळा, खंडाळा परिसरात वर्षांविहारासाठी अनेक युवक मद्यप्राशन करून गोंधळ घालतात. काही पर्यटक सहकुटुंब पर्यटनासाठी येतात. मद्यपी युवकांच्या टोळक्यांकडून अर्वाच्य भाषेत केली जाणारी शिवीगाळ तसेच हुल्लडबाजीमुळे पर्यटक विशेषत: महिला आणि युवतींना त्रास होतो. काही जण युवतींकडे पाहून अश्लील शेरेबाजी करतात. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी पर्यटकांनी केली.

पोलिसांसमोर सभ्यपणे वागणारे पर्यटक भुशी धरण परिसरात हुल्लडबाजी करतात. पोलिसांची पाठ वळताच काही जण गोंधळ घालतात. अशांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पर्यटकांचे प्रबोधन करण्यासाठी लोणावळा परिसरात जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यावा पण सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करू नये तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करू नये.

– बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 4:40 am

Web Title: lonavala tourism uproar in the name of tourism in lonavala zws 70
Next Stories
1 पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
2 मोहिते-टोपेंच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क!
3 भाजपची स्थिती चांगली, काँग्रेसपुढे आव्हाने