बहुराज्यीय दर्जा प्राप्त करणाऱ्या नाशिक र्मचट्स सहकारी बँकेवर सोमवारी रिझव्‍‌र्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली आणि या कारवाईमुळे घबराट पसरलेल्या ठेवीदार व खातेदारांची पैसे काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. गर्दीमुळे बँकेच्या जवळपास सर्वच शाखांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला. दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेने कोणतेही आर्थिक र्निबध लादले नसून खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व कर्मचारी संघटनेने केले आहे.
प्रदीर्घ काळापासून या बँकेची सूत्रे विद्यमान अध्यक्ष हुकुमचंद बागमार यांच्या हाती एकवटलेली आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहारांविरुध्द बँक कर्मचारी संघटना सातत्याने पाठपुरावा करत होती. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तथापि, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर शिंदे यांनी मात्र त्यास नकार देत व्यवस्थापकीय प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी केलेली ही तात्पुरत्या स्वरुपाची कारवाई असल्याचे म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार सोमवारी सकाळी जे. बी. भोरिया यांनी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. अकस्मात झालेल्या कारवाईमुळे सत्ताधारी बागमार गटाला हादरा बसला. बहुराज्यीय दर्जा प्राप्त झालेली आणि सुमारे पावणे दोन लाखहून अधिक सभासद असणाऱ्या बँकेची सर्व सूत्रे कित्येक वर्षांपासून बागमार यांच्याकडे आहेत. आपल्या कुटुंबियांना आर्थिक फायदा करण्यासाठी बँकेचा गैरवापर करणे, साखर घोटाळा, चुकीची माहिती देऊन रिझव्‍‌र्ह बँकेची दिशाभूल, नातेवाईक व हितसंबंधियांना नियमबाह्यपणे कर्ज वाटप, कर्ज देण्याच्या मोबदल्यात आर्थिक लाभ करवून घेणे, नातेवाईकांची खोटी कागदपत्रे तयार करणे आदींमध्ये बागमारांचा मुख्य सहभाग असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. बँकेवर प्रशासक नेमला गेल्याची माहिती समजल्यानंतर खातेदार व ठेवीदारांमध्ये एकच घबराट पसरली. दुपारनंतर बँकेच्या सर्वच शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली. यामुळे मध्यवस्तीतील काही रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा झाला.