एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत,” असं संतापजनक विधान लोणीकर यांनी केलं आहे. लोणीकर यांच्या भाषणाची क्लिप सगळीकडं व्हायरल होत असून, विरोधकांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलेल्या भाषणाची ऑडियो क्लिप सोशल माध्यमातून समोर आली. या भाषणात बोलताना लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा सर्वात मोठा मोर्चा काढण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. विशेष म्हणजे मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी एखादी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि जर कुणी भेटलं नाही, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील, असं विधान लोणीकरांनी केलं आहे.

लोणीकरांच्या या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीनं लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. “बबनराव लोणीकरांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. भाजपाची संस्कृती रसातळाला गेली आहे. महिला अधिकाऱ्याचा सन्मान करणं आवश्यक आहे. एका महिलेबाबत असं वक्तव्य करणं विनयभंगाचा गुन्हा आहे,” असं राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीही लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषध केला आहे.

लोणीकर नेमंक काय म्हणाले?

सरकारकडून २५ हजार रूपये अनुदान पाहिजे असेल, तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा? सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली, तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो. अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोकं आणेल, ५० हजार लोकं आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणु, तुम्ही सांगा चंद्रकांत पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील,” असं लोणीकर भाषणात म्हणाले.