रायगड समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेले रसायनयुक्त पिंप आणि त्यानंतर मुरुड परिसरात आढळलेले आठ बंदूकधारी संशयित यांचे गूढ अद्यापही उकलले नाही. मात्र या दोन्ही घटनांमुळे येथील सागरी सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुरुड, श्रीवर्धन आणि अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर गेल्या सात दिवसांत तब्बल ५६ ज्वालाग्रही रसायनाने भरलेली पिंपे वाहून आली. ही पिंपे किनाऱ्यावर लागेतोवर याचा थांगपत्ता कोणालाही लागला नाही. कोकण किनारपट्टीवर भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलीस अशा तीन सुरक्षायंत्रणा कार्यरत आहेत. या तिन्ही विभागांची पथक किनारपट्टीवर सागरी गस्त घालत असतात. मात्र समुद्रात भरतीसोबत वाहून येणारी ५६ पिंपे या सुरक्षा यंत्रणांना का दिसली नाहीत याचे उत्तर अद्यापही मिळू शकलेले नाही.
दुसरीकडे मुरुड तालुक्यातील वावडुंगी परिसरात आठ सशत्र व्यक्ती जंगलाच्या दिशेने जातांना नागरिकांना दिसतात. या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस दोन ते तीन तासांनी दाखल होतात. त्यानंतर शोधकार्य सुरू केले जाते.
दोन दिवसांच्या शोधमोहीम आणि नाकाबंदीनंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. ही एक चिंताजनक बाब आहे. सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस विभागात समन्वय नसल्याचेही दोन्ही घटनांमधून दिसून येत आहे.
२६-११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोकणात ११ सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. तटरक्षक दलाचे मुरुड, जयगड आणि मालवण येथे बेस कॅम्प सुरू करण्यात आले.
रत्नागिरीतील नौदलाच्या कॅम्पचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय झाला. पोलिसांना स्पीड बोट उपलब्ध झाल्या. पण  पोलिसांकडील २३ स्पीड बोटी नादुरुस्त आहेत, ज्या बोटी कार्यरत आहेत त्यांना चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित खलाशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा भाडेतत्त्वावर खलाशी घेऊन पेट्रोिलग करण्याची वेळ पोलिसांना येत आहे. मुरुड येथे तटरक्षक दलाला त्यांना तळ उभारण्यासाठी जागा मिळू शकलेली नाही.

नौदलाचे रडार कार्यरत असले तरी रसायनांनी भरलेली पिंपे अथवा तत्सम वस्तू या रडारवर दिसून येत नाही. तर हवाई गस्तीदरम्यान ही पिंपे अथवा वस्तू दिसल्या तरी समुद्रात पडलेल्या कचऱ्याप्रमाणे दिसतात. त्यामुळे किनाऱ्यावर आल्याशिवाय या वस्तू काय आहेत हे कळत नाही.
-नरेंद्र विसपुते, जनसंपर्क अधिकारी नौदल

खराब हवामानामुळे पिंपे एखाद्या जहाजावरून पडली असावीत पण ते जहाज कोणते याचा खुलासा होऊ शकलेला नाही. मुरुड परिसरात आढळलेल्या सशस्त्र व्यक्तीबाबत तटरक्षक दलाकडे माहिती नाही, ते पोलीस सांगू शकतील.
दीपक शर्मा, जनसंपर्क अधिकारी तटरक्षक दल

स्थानिकांच्या माहितीनंतर शोधमोहीम हातात घेण्यात आली आहे. मात्र अद्याप कुठलाही सुगावा लागलेला नाही. सध्या तरी शोधमोहीम आणि नाकाबंदी थांबवली जाणार नाही.
– राजा पवार ,  अप्पर पोलीस अधीक्षक