शहर हद्दवाढ भागात कुमठे येथे रात्री दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या एका महिला सराफाला अडवून २९ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याच्या गुन्ह्य़ाचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात लावला. याप्रकरणी आठ तरूणांना अटक करून त्यांच्याकडून संपूर्ण लुटलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांच्या ओळखीतून मैत्री होऊन त्यातून ही टोळी तयार झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
सुजाता नागराज वेर्णेकर (४०, रा. कुमठे, सोलापूर) यांचे कुमठे येथे ‘सत्यनारायण’ या नावाचे सराफी दुकान आहे. रात्री दुकान बंद करून वेर्णेकर आपल्या मुलाबरोबर सोन्याचे दागिने घेऊन घराकडे पायी चालत निघाल्या होत्या. त्या वेळी अचानकपणे मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरूणांनी वेर्णेकर यांच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी हिसका मारून पळवून नेली होती. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात दिलेल्या फिर्यादीत २० तोळे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी बळजबरीने लुटून नेल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी गुन्ह्य़ाचा तपास उघडकीस आणला असता २० तोळे नव्हे तर २९ तोळे सोन्याचे दागिने लुटले गेल्याचे निष्पन्न झाले.
या गुन्ह्य़ात अटक केलेल्या आठपैकी एक तरूण कुमठे येथील राहणारा तर उर्वरित सात जण लष्कर भागातील लोधी गल्लीतील राहणारे आहेत. राहुल उदयसिंग दवेवाले (२३), गणेश रामसिंग मदनावाले (२५), धनंजय सीताराम शिवलिंगवाले (२४), करण प्रताप जमादार (२५), मुकेश ऊर्फ ओटय़ा भीमसिंग सतारवाले (२४), गंगा ऊर्फ गंग्या किसनसिंग बोधीवाले (२१) व गजराज शीतलसिंग हजारीवाले (२१) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वानी कुमठे येथील राहणारा बबलू हुसेन शेख (२०) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश अष्टेकर व सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकारांना सांगितले. मूळ फिर्यादीत दोन गुन्हेगारांनी ही जबरी चोरी केल्याचे म्हटले होते. परंतु तपासात आठ जणांचा सहभाग आढळून आला. गेल्या महिन्यापूर्वी या टोळीने सराफ सुजाता वेर्णेकर यांना लुटण्याचे कारस्थान रचले होते. गुन्ह्य़ात बनावट क्रमांकाच्या मोटारसायकलीचा वापर करण्यात आला होता. या टोळीतील मुकेश सतारवाले व गंगा बोधीवाले हे दोघे पोलिसांकडील माहितीनुसार सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी एमपीडीएअन्वये स्थानबध्दतेची कारवाईही करण्यात आली होती.
या टोळीकडून गुन्ह्य़ात लुटलेले मंगळसूत्र, गंठण, अंगठय़ा, बोरमाळ, झुबे, कर्णफुले, नेकलेस असा २९तोळे सोन्याचे दागिने तसेच चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. हस्तगत मालाची किंमत आठ लाख १० हजार रुपये इतकी आहे. हा ऐवज राहुल दवेवाले याच घरात दडवून ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सहायक पोलीस निरीक्षक गोविंद आदटराव, उपनिरीक्षक डी. एस. देसाई, सहायक फौजदार कमलाकर माने, हवालदार हारून पटेल, सुराज मुलाणी, मुन्ना शेख, रामदास गायकवाड, गणेश शिर्के, सागर सरतापे, कोळवले यांच्या पथकाने हा गुन्हा केवळ  २४ तासात उघडकीस आणल्याबद्दल या पथकाला पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.