अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ९ हजार एकरातील द्राक्ष आणि डाळिंब पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानीचा प्राथमिक अंदाज सुमारे ४० कोटींच्या घरात पोहोचला आहे. फळपिकांचे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष पिकांवर औषध फवारणीसाठीही मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागत आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या सप्ताहात सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नदीकाठच्या ऊसतोडी थांबल्या असून कारखान्याचा हंगामही लांबण्याची शक्यता आहे. शिराळा तालुक्यात भात पिकाची सुगी अंतिम टप्प्यात आली असतानाच पावसाने हजेरी लावल्याने रानात मळणीसाठी काढून ठेवलेल्या भाताचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत मोठय़ा प्रमाणावर डाळिंब व द्राक्षाची लागवड असून या ठिकाणी विचित्र हवामानाचा जबर तडाखा बसला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात झालेल्या पीकहानीची प्राथमिक पाहणी जिल्हा कृषी विभागाने केली असून ९ हजार ४८५ एकरवरील फळपिकांना फटका या अवकाळीने बसला आहे.
द्राक्ष पिकाला सर्वाधिक तडाखा या अवकाळीचा बसला असून हानीग्रस्त क्षेत्राची कृषी विभागाने दिलेली माहिती अशी, कवठे महांकाळ-द्राक्ष ५५० हेक्टर आणि डाळिंब ४६० हेक्टर, खानापूर द्राक्ष १८० आणि डाळिंब ५, आटपाडी द्राक्ष ३१ आणि डाळिंब २००, तासगाव द्राक्ष ६००, पलूस द्राक्ष ३१८, जत ४४० आणि मिरज ५५० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष पिकाची हानी या अवकाळी पावसाने झाली आहे.
अवकाळी पावसाने द्राक्ष बागेतील घडाची गळ होत असून फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. फुलोऱ्यात असणाऱ्या बागांवर दावण्या व करपा या बुरशीजन्य रोगाचा फैलाव झाला असून या रोगापासून पीक वाचविण्यासाठी महागडय़ा औषधांची फवारणी करावी लागत आहे. एकावेळच्या औषध फवारणीसाठी केवळ औषधांचा खर्चच ३ ते ५ हजार रूपये करावा लागत आहे.
अवकाळी पावसाने पक्व  झालेल्या डाळिंबावर बिब्ब्याची लागण झाली असून तयार माल जागेवरच खराब होत आहे. सरासरी एकरी ५० हजाराचे आíथक नुकसान झाले असून जिल्ह्यातील एकूण नुकसान ४० कोटींच्यावर गेले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे अर्थशास्त्रच कोलमडले असून आता हंगाम कसा पार पाडायचा आणि पुढील हंगामाची तयारी कशी करायची, हा यक्षप्रश्न अवकाळीने शेतक-यांसमोर उभा केला आहे.