सहा ते सात फेऱ्या अपेक्षित असतानाही नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत केवळ दोन ते तीनच फेऱ्या

ऑक्टोबर महिन्यापासून पालघर जिल्ह्य़ातील मच्छीमारांच्या मासेमारी करण्यासाठी समुद्रात केवळ दोन ते तीन फेऱ्या झाल्या असून बहुतांश बोटी १५ ते २० दिवस किनाऱ्यावर उभ्या होत्या. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सहा ते सात फेऱ्या होणे अपेक्षित असतानाही कमी फेऱ्या झाल्याने यंदा मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्याशिवाय झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडे निकष नसल्याने मच्छीमार अडचणीत सापडले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नवरात्र असल्याने अनेक ठिकाणी मासेमारी बंद होती. दसऱ्यानंतर आठ ते दहा दिवसांची मासेमारीची एक फेरी झाल्यानंतर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर थांबून राहिल्या. पुन्हा काही मच्छीमार बोटींनी एक फेरी मारल्यानंतर पुन्हा चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय झाल्याने दिवाळीच्या पूर्वीची बोटींना नांगरून ठेवावे लागले. दिवाळी सरल्यानंतरही माहा चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहिल्याने मासेमारी बोटी समुद्रात गेल्या नाहीत. या वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर १० व ११ नोव्हेंबर रोजी बोटी पुन्हा मासेमारीसाठी निघाल्या.

ऑक्टोबरपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सहा ते सात फेऱ्या होणे अपेक्षित असताना जेमतेम दोन ते तीन फेऱ्या झाल्या आहेत. १७ ते २० दिवस आणि दिवाळीच्या कार्यकाळात मासेमारी बंद राहिल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या काळात मासेमारी बोटींना प्रत्येक फेरीदरम्यान किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून या कालावधीत अनेक बोटीमध्ये बर्फ भरून ठेवला गेला होता. मासेमारी नौकांवर खलाशांना पगार द्यावा लागत असल्याने प्रत्येक मच्छीमार बोटीचे किमान पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

समिती स्थापन करण्याची मागणी

मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी शासनाकडे निकष नसल्याने भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे निकष ठरवण्यासाठी मच्छीमार, या क्षेत्रातील जाणकार मंडळी, अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी पुढे येत आहे. त्याच पद्धतीने मासेमारी बोटींसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, कर्जाच्या परतफेडीची सवलत द्यावी किंवा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.

सुक्या मासळीचेही नुकसान

बोंबील, करदी, कोळंबी आणि इतर मासे स्थानिक बाजारातून घेऊन ते सुकवण्याचा मोठा व्यवसाय जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांमध्ये आहे. ऑक्टोबर महिन्यात असलेल्या उष्णतेचा लाभ घेऊन मोठय़ा प्रमाणात मासे सुकवले जातात आणि नंतर वर्षभर त्यांची विक्री करून या व्यवसायातील कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. अवकाळी पावसामुळे सुकत ठेवलेले मासे कुजले असून याकामी खरेदीखर्च व श्रम वाया गेले आहे. अशा कुटुंबीयांसोबत आगामी काळात विक्री कोणत्या माशांची करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील मच्छीमारांच्या जेमतेम दोन ते तीन फेऱ्या झाल्या असून मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे निकष ठरवले नसून याकरिता तातडीने समिती तयार करण्याची गरज आहे. मच्छीमार बोटींवर असलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी मच्छीमारांनी केले आहे. – राजन मेहेर, अध्यक्ष, सातपाटी मच्छीमार विविध सहकारी संस्था