बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा बागायतींना बसला आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल बनले आहेत. या बदलामुळे आंबा मोहोर व फळाची गळती झाली असून, या गळतीचे प्रमाण ६० टक्के आहे. कोकण कृषी विद्यापीठाने तातडीने संशोधन करावे, अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली.
गेली काही वर्षे आंबा बागायतीवर वारंवार संकट येत आहे. या संकटाला बागायतदार सामोरे जात आहेत. मात्र कराराने बागायती घेणारे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडत असल्याची चर्चा आहे.
वातावरणात वेळोवेळी होणारे बदल व रिकरिग फ्लॉवरिंगमुळे (दुबार मोहोर) आंबा मोहोर व फळाची सुमारे ६० टक्के घळ झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. हंगामापूर्वीच बागायतदारांनी कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार फवारणी करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे बागायतदारांनी सांगितले.
हापूस आंबा गतवर्षी थ्रीप्स, तुडतुडे, वाद या अडथळ्यात सापडला होता. त्यामुळे बागायतदार धास्तावले होते. या हंगामात बदलते हवामान व दुबार मोहोराचा परिणाम आंबा पिकावर होत आहे, असे बागायतदार यांनी स्पष्ट केले आहे.
आंबा फळाची घळ अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन व वातावरणातील बदल यामुळे होऊ शकते, पण त्यावरही बागायतदारांनी मात करण्याचा प्रयत्न केला. आता कृषी विद्यापीठाने त्यावर जलद गतीने संशोधन करावे, अशी मागणी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४० हजार बागायतदारांना सन २०११-१२ या आर्थिक वर्षांतील आंबा भरपाईपोटी २० कोटी रुपये मिळणार आहेत. ही भरपाई प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये असणार आहे, असे सांगण्यात आले.
आंबा नुकसानभरपाईपोटी मागील वर्षांतील ही भरपाई बँक खाती जमा केली जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्य़ातील ४० हजार आंबा बागायतदारांना नुकसानीची झळ पोहोचली होती.