मोहन अटाळकर

एकीकडे करोना विषाणूच्या प्रादुवाची चिंता सुरू झाली असताना संत्र्याच्या दराने अवघ्या आठवडाभरात दुप्पट मुसंडी मारल्याने संत्री उत्पादक शेतकरी सुखावला खरा, पण त्यांना मिळालेला हा दिलासा औटघटकेचा ठरला. आंतरराज्यीय आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्याने संत्र्याची वाहतूक थांबली, त्याचा मोठा फटका विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला आहे.

ऊन वाढू लागताच संत्र्याच्या दरात सुधारणा होतेच, पण यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संत्र्यातील ‘क’ जीवनसत्वाचा आरोग्यवर्धक म्हणून बोलबाला झाल्याने त्याचा परिणाम दर सुधारण्यावर झाला. त्यातच विदर्भातील संत्री बांगलादेश, नेपाळ, दुबईपर्यंत पोहचली. यावर्षी संत्री बाजारात येताच २० ते २५ हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला. फेब्रुवारीत आवक वाढल्यानंतर दरात कमालीची घसरण होऊन १० ते १२ हजार रुपये प्रतिटनपर्यंत दर स्थिरावले. पण, करोनाचे संकट गहिरे झाल्यावर संत्र्याची मागणी वाढली. २० मार्चपर्यंत मोठय़ा आकाराच्या फळाचे दर २९ ते ३० हजार रुपये टनांवर पोहचले होते.

पंजाबमधील किन्नो या संत्र्याचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा असतो. बाजारात इतर फळांची आवक कमी होते, अशा स्थितीत विदर्भातील संत्र्याला मागणी वाढते आणि भाव वधारतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गेल्या वर्षी पाण्याअभावी विदर्भात ३० टक्के संत्राबागा सुकून गेल्या होत्या. त्यामुळे उत्पादकता देखील खालावली. यावर्षी मृग बहारात संत्र्याला पोषक वातावरण मिळाले. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना त्याचाही लाभ झाला. संत्र्याचे जादा उत्पादन होऊनही दर फारसे कमी झाले नाहीत, याचे समाधान शेतकऱ्यांना होते. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी संत्र्याची तोड थांबविली, पण महाराष्ट्रात जमावबंदी आणि त्यानंतर आंतरजिल्हा वाहतूक बंद झाल्याने त्याचा मोठा फटका या शेतकऱ्यांना बसला.

वरूड आणि मोर्शी तालुक्यातून दिवसाला चारशे ते पाचशे ट्रक संत्री परप्रांतात जातात. परंतु देशपातळीवर टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली, झारखंड, केरळ, बांग्लादेश आणि मुंबईला जाणारे ट्रक थांबले आहेत. संत्र्याच्या काढणीचे अखेरचे दिवस असल्याने संत्री झाडांवरून तोडणे आवश्यक असते. तोडाई बंद झाल्यामुळे फळगळ सुरू झाली आहे.

कधीकाळी शेतकऱ्यांसाठी वैभवशाली ठरलेल्या संत्रा बागा बेभरवशाची बाजारपेठ, गारपीट, रोगराई आदी विविध कारणांमुळे जीवघेण्या ठरत असल्यामुळे संत्राही शेतकऱ्यांसाठी कापसासारखा घातक ठरू पाहत आहे. सुमारे चार दशकांपासून बागायत पट्टय़ातील शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत संत्र्याने जगण्याचे बळ दिले. त्यामुळे वरुड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, अचलपूर या प्रमुख तालुक्यातील संत्रा उत्पादकांची आर्थिक ड्टारड्टाराट झाली. वरुड, मोर्शी तालुक्याला कधीकाळी ‘कॅलिफोर्निया’चा लौकिकही मिळाला. संत्र्याला सध्या विविध अडचणींच्या ‘डिंक्या’ रोगाची लागण झाल्याने काही वर्षांत संत्राबागा मरणासन्न अवस्थेत पोहचल्या होत्या. गेल्या तीन ते चार दशकांमध्ये परंपरागत पिकांतून मिळणाऱ्या मोबदल्यातून जगणेही मुश्किल झाले होते. तुलनेने संत्र्यातून मिळणाऱ्या समाधानकारक उत्पन्नामुळे मोठय़ा प्रमाणात संत्रा बागा फोफावल्या. वरुड आणि मोर्शी तालुक्यात संत्र्यासोबतच पणेरीचाही व्यवसाय वाढला. त्यातून परराज्यातही मोठय़ा प्रमाणात संत्रा कलमांची विक्री होऊ लागली. संत्रा व कलमा विक्रीच्या माध्यमातून या दोन तालुक्यात शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळता राहिला. या तालुक्यातील संत्रा कलमा राजस्थानात गेल्या. कालांतराने सर्वत्र संत्रा बागा मोठय़ा प्रमाणात वाढत गेल्या. सर्वत्र संत्र्याचे उत्पादनही वाढले.

मागील वर्षी हजारो हेक्टरमधील संत्रा बागा पाण्याअभाावी होरपळल्या होत्या. त्यातून बचावलेल्या बागांमध्ये यंदाच्या समाधानकारक पावसाने मृग बहर फुटला. आंबिया बहराचे लक्तरे झाल्यानंतर मृग बहारातून तरी जगण्याचे बळ मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरवातीला ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. पण, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

अमरावती जिल्ह्यात सर्वच संत्री दलालांमार्फत विकली जातात. दलाल व्यापाऱ्यांचेच हित अधिक जोपासत असल्यामुळे यात शेतकऱ्यांचाच गळा दाबला जातो. त्यातच कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना दलालांच्या साखळीवरच विसंबून रहावे लागते.

करोनाचा विळखा, पावसाचा फटका

साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांनी शेतात येऊन सौदे करण्यास सुरूवात केली होती. काही व्यापाऱ्यांनी संत्र्याचे मळे खरेदीही केले, वाहतूक सुरू असताना काही अडचण नव्हती, पण वाहतूक बंद झाल्याबरोबर शेतकरी संकटात सापडले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरूड तालुक्यात संत्र्याच्या बागा मोठय़ा प्रमाणात आहे. परप्रांतात जाणारी संत्री शेतातच पडून राहिली. त्यातच बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भाागातील संत्र्याची फळे गळून पडली आहेत. संत्र्याचा हा सडा आणि करोना विषाणूचा विळखा शेतकऱ्यांसाठी मोठे संकट घेऊन आला आहे. वाहतूक बंद झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी सौदे सोडून दिले आहेत. त्यात विदर्भातील शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.

संत्री उत्पादक संकटात

करोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संत्री उत्पादकांचे अर्थकारणच बिघडले आहे. सरकारने संत्र्यांची वाहतूक खुली करून देण्याबरोबरच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा फार अल्पकाळ मिळाला. त्यानंतर वाहतूकच बंद झाली. शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.

– रवी पाटील, संचालक, कृषी समृद्धी उत्पादक कंपनी, अचलपूर