– वसंत मुंडे
विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपा नेतृत्वाने उमेदवारी नाकारून धक्का दिला. विधानसभेतील दारुण पराभवानंतर पंकजा यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यातून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘लक्ष्य’ केल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्रात पक्षालाच पंकजा यांच्या नेतृत्वाची गरज असल्याने उमेदवारी मिळणार असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता, त्यामुळे पराभवापेक्षाही पक्षाने डावल्याचा राजकीय ‘वार’ त्यांच्या वर्मी लागला असल्याची शक्यता आहे. पक्ष कोणाच्याही ‘बापाचा’ नसतो हे अगोदरच स्पष्ट केल्याने पंकजा यांच्या राजकीय पुनर्वसनाची वाट आता खडतर दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी, गोपीनाथ गडावरील मेळाव्यातून पक्षाच्याच नेत्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना ‘रसद’ पुरवली त्यामुळे आपला पराभव झाला, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. तुम्ही मला काय देणार ? भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे, मी का सोडू? असे सांगत, यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याची घोषणा त्यांनी केली होती.

आणखी वाचा- “दिवसभर फोन घेतले नाही, कुणाकुणाला उत्तर देऊ”, उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज

पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेत पाच वर्षे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील अप्रत्यक्ष वाद सातत्याने चर्चेत राहिले आहेत. जलसंधारण खाते बदलणे, चिक्की घोटाळा आरोप, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री यातून ही अर्तंगत धुसफूस वेळोवेळी उघड झाली. निवडणुकीच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड शहरात दाखल झाली आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांचे स्वागत स्विकारल्याने पंकजा मुंडे थेट रथामधून उतरून निघून गेल्या होत्या. तेव्हा फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

आणखी वाचा- भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले नाराज, एक जागाही दिली नाही

परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पराभव पक्षांतर्गत स्पर्धेतून झाल्याचे सांगत फडणवीस यांना लक्ष्य केले होते. तर त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमातून फडवणीस यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीकाही केली होती. भाजपाला ओबीसी समाजाचा चेहरा आणि गर्दी खेचणारा नेता म्हणून पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेऊन राजकीय पुनर्वसन करावेच लागेल, असा दावा समर्थकांकडून केला गेला होता. दोन दिवसापासून पंकजा यांच्याकडून निवडणूक लढविण्यासाठीच्या कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली होती. मात्र पक्षनेतृत्वाने  जुन्यांना वगळून नव्यांना संधील दिल्याचे दिसू आले. यामुळे, भाजपातून पंकजा यांच्या राजकीय पुनर्वसनाची वाट अधिकच खडतर झाल्याचे दिसत आहे.