वादळी पावसाने मंगळवारी दुपारी कराड तालुक्याची दैना उडवताना, ३१ लाखांचे नुकसान झाले आहे. वळिवाच्या पावसासह जोराच्या वा-याच्या तडाख्याने ५४ घरांची पडझड होऊन १७ लाख रूपयांचे, तर आंबा, केळी व उसासह अन्य पिकांचे १५ लाखांचे असे सुमारे ३१ लाखांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पावसाने अनेक ठिकाणी आंब्याचेही नुकसान झाले आहे. किवळ येथे ७० गुंठे क्षेत्रातील ऊस पिकाचे तर दीड हेक्टर केळी पिकाचे असे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. निगडी येथे संजय गुरव यांच्या गुरांच्या गोठय़ावरील पूर्ण पत्रा उडून जाताना, दोन गाई जखमी झाल्या आहेत.
मसूर, उंब्रज, कोळे, तांबवे या मंडलातील अनेक गावात घरांवरील पत्रे उडून अनेक संसार उघडय़ावर पडले. वारूंजी येथील सिध्दनाथ नगरमधील घराचे छत उडून भिंत कोसळली. मसूर परिसरातील किवळ, निगडी, हणबरवाडी, हेळगाव भागातील घरे, शेड, छप्परे उडून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणच्या गावातील घरावरील पत्रे उडून तसेच घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले. रस्त्यावर झाडे उन्मळल्याने काही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.
वरील नुकसानीचे पंचनामे महसूल विभागातर्फे करण्यात आले आहेत. यामध्ये भोसलेवाडी येथे एका घराची पडझड होऊन ५० हजार रूपये, पाडणी येथे १२ घरांचे सुमारे १ लाख ६४५० रूपये, हेळगाव व गोसावेवाडी येथील ७ घरांचे सुमारे १ लाख ३२ हजार ६०० रूपये, कोपर्डे हवेली येथे दोन घरांचे ५४ हजार ८०० रूपये, भुयाचीवाडी  येथील एका घराचे ४२ हजार रूपये, सुर्ली येथे एका घराचे ३० हजार ४०० रूपये, कुसूर येथे ३ घरांचे ९० हजार रूपये, शिंदेवाडी (कोळे) येथे २ घरांचे ७५ हजार रूपये, तांबवे येथे ७ घरांचे सुमारे ३ लाख ८० हजार रूपये, किरपे येथे ९ घरांचे सुमारे ४ लाख १५ हजार रूपये, निगडी व हणबरवाडी येथे प्रत्येकी एका घरांचे ७० हजार रूपये, मेरवेवाडी येथील प्राथमिक शाळेचे सुमारे ७६ हजार रूपये, किवळ येथे १६ घरांचे सुमारे  २ लाख १३ हजार रूपये यासह कराड मंडलातही काही घरांचे नुकसान झाले आहे.