काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं रविवारी पुण्यात निधन झालं. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकती बिघडली आणि रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. राजीव सातव निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “राजीव सातव यांच्या जाण्याने संसदेतला मित्र गमावला” असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सातव यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत राजीव सातव यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

“संसदेतील माझे मित्र राजीव सातव जी यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अधिक क्षमता असलेले भविष्यातील आगामी नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांबद्दल मला दु:ख आहे. ओम शांती”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीव सातव यांच्या निधनानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. “काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सातव यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. “महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली!” असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.


दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी सकाळी निधन झाले. गेल्या २३ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.