एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी नागपुरातील एका लॉटरी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस सुत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल आग्रेकर (वय ३१) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वडिल सुरेश आग्रेकर हे नागपूरातील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक आहेत. नागपूर पोलिसांना बुधवारी एका तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शहरातील बुटीबोरी भागात आढळून आला. हा राहुलचाच मृतदेह असल्याचे निष्पण्ण झाले आहे. या प्रकरणात दोन संशयीतांची ओळख पटली असून ते अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुल आग्रेकर हा मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांना एका निनावी फोनवरुन राहुलचे अपहरण केल्याचा फोन आला. त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी राहुलच्या कुटुंबियांकडे १ कोटी रुपयांची मागणीही केली. त्यानंतर ताबडतोब राहुलच्या कुटुंबियांनी लकडगंज पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

प्राथमिक चौकशीनुसार पोलिसांना राहुलच्या घराजवळील एका चहा विक्रेत्याकडून माहिती मिळाली की, सकाळी साडे आठच्या सुमारास त्याने राहुलला दोन व्यक्तींसोबत एका जीपमध्ये बसल्याचे पाहिले होते. दरम्यान, बुधवारी पोलिसांना एका तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्याची ओळख पटत नव्हती. मात्र, हा मृतदेह राहुलचाच असल्याचे आज निष्पण्ण झाले. तपास करणारे पोलिस अधिकारी खांडेकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, अपहरणकर्त्यांची ओळख पटली असून दुर्गेश बोकडे आणि पंकज हरोडे अशी त्यांची नावे असून ते सुद्धा लॉटरी विक्रेते असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून फरार आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.