रविवारी सुटीच्या दिवशी नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेल्या उमरगा तालुक्यातील प्रेमी युगुलाने किल्ल्यातील एका बुरूजावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुर्देवाने हे युगुल बचावले असले तरी पायाला आणि कमरेला जबर मार लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवक २३ वर्षाचा असून युवती १९ वर्षांची आहे. किल्ल्याच्या बुरूजावरून एखाद्या युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नळदुर्ग किल्ल्याला नवी झळाळी मिळाल्यापासून दररोज किल्ला पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येतात. यात विद्यार्थी, नागरिक यांच्यासह प्रेमी युगुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रविवार, ८ एप्रिल रोजी इतर पर्यटकांप्रमाणे उमरगा तालुक्यातील एक प्रेमी युगुल किल्ला पाहण्यासाठी आले. किल्ल्याच्या दक्षिणेकडील एका बुरूजावरून या दोघांनी चक्क खाली उडी घेतली. सुरूवातीला तरूणीने खाली उडी घेतली, तिच्यापाठोपाठ तरूणाने बुरूजावरून खाली झेप घेतली. सुदैवाने हे युगुल बचावले असले तरी उंचावरून उडी घेतल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या दोघांमध्ये भांडण झाले होते, की दोघांनी ठरवून उडी घेतली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आत्महत्येच्या प्रयत्नातून बचावल्यानंतर पाय घसरून खाली पडल्याचे सांगत या युगुलाने पोलिसांचा ससेमिरा चुकविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या बुरूजावर पाहण्यासारखे काहीच नाही. पर्यटक सहसा त्या बाजूला फिरकत देखील नाहीत. दरम्यान मुलाने लग्नास नकार दिल्यामुळे मुलीने ही आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा बघ्यांमध्ये होती.