वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व दलाली असे किळसवाणे स्वरूप प्रस्थापित मंडळींनी या निवडणुकीस दिले. पेड न्यूज व जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे बहुतेक प्रसारमाध्यमांनी तोच कित्ता पुढे चालविला असल्याची टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीने केली.
माकपच्या ‘जीवनमार्ग’ या मुखपत्रातील ताज्या अंकात या संदर्भात ऊहापोह केला आहे. डाव्या शक्तींसमोरील आव्हानांबद्दल चर्चा करताना यात म्हटले आहे, की निवडणुकीतील भाषणे एखाद्या साचलेल्या व सडलेल्या पाण्यातील विषारी वायूंच्या बुडबुडय़ासारखीच भासत आहेत. या शाब्दिक बुडबुडय़ांमधून शेतकरी, कामगार, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आदींबाबत आत्मीयता दिसून येत नाही. शेणात वळवळणाऱ्या विविधरंगी दुतोंडी अळ्यांची मोजदाद आणि वर्णने जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाप्रमाणे करणे, इतकाच या संदर्भातील वृत्तांचा अन्वयार्थ असल्याचे मुखपत्रात म्हटले आहे.
शासकीय सत्ता एखादी सरंजामी दौलत असून, तिचा वारस वा वैयक्तिक जेता निवडण्यासाठी खेळ सुरू आहे. राजकारण म्हणजे बुद्धिबळ व नेते म्हणजे त्यावरील मोहरे असे मानण्यापर्यंत माध्यमे पोहोचली आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व या सर्वात ‘जोकर’ म्हणता येईल, असा मनसे या पक्षांमध्ये परस्परविरोध व बेताल बडबड सुरू आहे. रिपब्लिकन पक्ष हा मुळात कम्युनिस्ट चळवळीतील नैसर्गिक, स्वाभाविक मित्र व सहकारी. परंतु या पक्षाने महायुतीसोबत जाण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला आणि त्याची परिणती या पक्षात आणखी एका फुटीत झाली. शिवसेना-भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांमध्ये आर्थिक-सामाजिक विषयांत बहुतेक प्रश्नांवर धोरणांबाबत जवळपास एकमत आहे. त्यामुळे त्यांच्यात सहज परस्पर देवाण-घेवाण आहे. राज्यातील कराचे उत्पन्न ८ टक्क्य़ांवरून १२ टक्क्य़ांवर नेणे शक्य असले, तरी या संदर्भात धनदांडग्यांच्या ५ प्रमुख पक्षांकडे कोणताही विचार नाही. कारण करबुडव्यांचे हस्तक व दलाल म्हणूनच हे प्रमुख ५ पक्ष राजकारण करीत आहेत, अशी टीका पत्रात आहे.
राज्यातील सार्वजनिक शिक्षणाचा सर्व सरकारांनी बोजवारा उडवला. शिक्षण क्षेत्रात किळसवाणा बाजार सुरू आहे. वीजनिर्मिती आणि रस्त्यांच्या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीचे धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबिले आहे. सार्वजनिक आरोग्य, सिंचन, दलित अत्याचार, शेतकरी आत्महत्या आदींसंदर्भात प्रमुख पक्षांकडे काही कार्यक्रमच नाही. कारण ते स्वत:च या प्रश्नाचा भाग आहेत. पर्यायी कार्यक्रम मांडून राज्याची या पक्षांकडून सुटका करणे, हेच या निवडणुकीत डाव्यांसमोर आव्हान असल्याचेही मुखपत्रात म्हटले आहे.