दुष्काळी पट्टय़ात खरीप पेरण्यांची सुगी

पावसाअभावी पश्चिम महाराष्ट्रातील जलसाठय़ांचा टक्का वाढता वाढेना असे चित्र असून, शासकीय दप्तरी पावसाळय़ाचा महिना संपत आला तरी तळाशी असलेले जलसाठे ‘जैसे थे’ आहेत. दमदार पावसाची पाठ आणि तळाशी असलेल्या जलसाठय़ांमुळे कृष्णा, कोयना नद्यांकाठी चिंता व्यक्त केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजअखेर अत्यल्प पाऊस कोसळला असल्याने शेतकरी वर्ग दमदार पावसाची आशा बाळगून आहे. मात्र, समाधानकारक पावसामुळे दुष्काळी पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात पेरण्या होत असल्याचे सुखद चित्र आहे.

पावसाचे तालुके वरूणराजाच्या कृपादृष्टीच्या प्रतीक्षेत असताना, मान्सूनपूर्व तसचे मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसाने दुष्काळी माण, खटाव, खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले असून, खरिपाच्या पेरण्या मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

आज दिवसभरात कोयना, वारणा, दूधगंगा या धरण क्षेत्रांचा अपवाद वगळता अन्य धरणांच्या पाणलोटात पाऊस कोसळला नसल्याची आकडेवारी नाही. कोयना धरणाचा जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला असून, गुरुवारी दिवसभरात कोयनेच्या पाणलोटात सरासरी ३७ एकूण ४६२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हा पाऊस ११८७.३३ मि.मी. नोंदला जाताना कोयना शिवसागराचा जलसाठा ५१ टीएमसी म्हणजेच ४८.४५ टक्के असा होता. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणात सर्वाधिक कमी म्हणजेच शून्य टक्के पाणीसाठा पुणे जिल्ह्णाातील टेमघरचा तर, सोलापूर जिल्ह्णाातील उजनी उणे २८.३९ म्हणजेच उणे ५३ टक्के असून, सातारा जिल्ह्णातील उरमोडी प्रकल्पाचा पाणीसाठा सर्वाधिक ३५.८४ टक्के आहे.