शेतमाल आणि बागायती पिकांना बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत आहे. दरवर्षी कांद्याला प्रतिकिलो किमान १५ रुपये असा दर मिळायचा. पण या वर्षी शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत केवळ दोन ते तीन रुपये दराने कांदा विकत घेतला जात आहे. यामुळे नैराश्य आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा शेतातच गाडण्यास सुरुवात केली आहे.

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील सौदागर चंद्रहार जाधव या शेतकऱ्याने आपल्या शेतात तीन महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती. कांद्याच्या माध्यमातून दुष्काळात दिलासा मिळेल, प्रपंच नेटका चालेल ही कांदा लागवडीमागील त्याची भावना होती. महागडे रोप, लागवड खर्च, मेहनत आणि महागडी खते वापरून कांदा तळहातावरील फोडाप्रमाणे जाधव यांनी जपला होता. कांदा लागवड आणि काढणीचा खर्च पाहता व शेतातून दीड ते दोन एकरात पन्नास कट्टे कांदा उत्पादित झालेला असताना उत्पादित मालाला मिळणारा भाव व कांदा लागवड करुन तो काढणीपर्यंतचा जो खर्च आहे, त्याची पडताळणी केली असता शेतकऱ्यांना हा कांदा रडवल्याशिवाय राहत नाही, असे मंगरुळच्या शेतकऱ्यांचे म्हणणे.

सध्या सोलापूर किंवा इतर बाजारपेठेत शेतकरी कांदा घेऊन गेला तर तो कांदा दोन ते तीन रुपये किलो दराने घेतला जात आहे. त्यातच कांदा बाजारपेठेपर्यंत नेण्याचे भाडेही या कांद्याच्या उत्पन्नातून मिळत नाही. मग कांदा विकून तरी करावे काय, कारण कांदा विक्री करण्याकरिता शेतकरी बाजारपेठेत गेला तर पदरमोड करून वाहनभाडे द्यावे लागत आहे. भावच नाही तर कांदा विकण्यात काय फायदा म्हणून सौदागर जाधव यांनी आपल्या शेतातील कांद्यावर जड अंतकरणाने नांगर फिरवला आहे.