14 October 2019

News Flash

कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वर गोठले

घरांबाहेर साठवून ठेवलेले पाणी गोठल्याचे दिसून आले.

उत्तरेकडून येणाऱ्या अतिशीत वाऱ्यामुळे महाराष्ट्राचे काश्मीर असेलेले महाबळेश्वर शनिवारी अक्षरश: गोठून गेले. महाबळेश्वरलगतच्या दाट डोंगरझाडीच्या भागात आज सर्वत्र शेती-वाडी, पाणवठे, घरा-वाहनांच्या छतावर हिमकणांची दाट चादर पसरली होती. परिसरात अनेक घरांबाहेर साठवून ठेवलेले पाणी गोठल्याचे आज सकाळी दिसून आले. शनिवारी सकाळी जाणवलेली ही थंडी या हंगामातील सर्वात निचांकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या अतिशीत वाऱ्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्रच थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरमध्येही तो जाणवत होता. काल रात्रीपासून या थंडीत वाढ होत सगळे जनजीवन ठप्प झाले होते.

आज सकाळी तापमानात मोठय़ा प्रमाणात घट होत परिसरातील वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात ठीक ठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण मोठय़ा प्रमाणात तयार झाल्याचे पाहावयास मिळाले. परिसरातील शेती, पाणवठे, घरा-वाहनांच्या छतावर सर्वत्र गोठलेल्या दवबिंदूंच्या हिमकणांची दाट चादर पसरली होती. पर्यटकांनी गोठलेल्या दवबिंदूंचा आनंद लुटला. दरम्यान महाबळेश्वर परिसरात तापमानाची नोंद घेण्याची शासकीय यंत्रणा नसल्याने नेमकी आकडेवारी उपलब्ध होण्यात अडचण येत आहे.

नाशिकमध्ये थंडीमुळे दोघांचा मृत्यू

नाशिकमध्ये शनिवारी चार अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड तालुक्यात पारा तीन अंशापर्यंत खाली घसरला. उघडय़ावर वास्तव्य करणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. संबंधितांची ओळख पटलेली नाही. अंदाजे ६५ आणि ६० असे त्यांचे वय आहे.

द्राक्षांच्या दरात घसरण

देशातील थंडीच्या लाटेने द्राक्षांच्या दरात घसरण झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात द्राक्षांचा घाऊक बाजार भरतो. या ठिकाणी १५ किलो द्राक्षांना (जाळी) केवळ ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. गेल्या वर्षी हे दर ८०० ते ९०० रुपये असल्याचे उत्पादकांनी सांगितले. जानेवारीपासून देशांतर्गत बाजारात द्राक्षांची मागणी वाढते. या काळात माल मोठय़ा प्रमाणात बाजारात येऊ लागतो. थंडीमुळे देशांतर्गत बाजारातून मालास फारशी मागणी नाही. थंडी निरोप घेत नाही, तोवर द्राक्षांची मागणी वाढणार नाही. मागणी नसल्याने स्थानिक पातळीवर द्राक्षांचे दर घसरले आहेत.

First Published on February 10, 2019 12:18 am

Web Title: low temperature in mahabaleshwar