गेल्या अनेक वर्षांतील जून महिन्यातील सर्वात कमी पावसाची नोंद या वर्षी घाटघर, भंडारदरा परिसरात झाली असून, जून महिन्याच्या तीस दिवसांत भंडारद-यात फक्त ५० मिमी पाऊस पडला. हा अलीकडच्या अनेक वर्षांतील पावसाचा नीचांक आहे.
घाटघर भंडारदरा परिसरात जूनच्या मध्यापासून चांगल्या पावसास सुरुवात होत असते. पण पावसाचे आगर समजल्या जाणा-या या परिसरावर यंदा पाऊस रुसला आहे. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणा-या घाटघरमध्ये जून महिन्यात फक्त १५३ मिमी पाऊस पडला, तर सर्वाधिक म्हणजे फक्त १८४ मिमी पाऊस पांजरे येथे नोंदवला गेला. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पडलेल्या पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. जूनच्या दुस-या आठवडय़ात थोडाफार पाऊस घाटघर, रतनवाडी परिसरात पडला. मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. मागील वर्षीच्या तुलनेतही या वर्षी जून महिन्यातील पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात या वर्षी आणि गतवर्षी (कंसातील आकडे) पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- भंडारदरा ५० (४१३), घाटघर १५३ (७४९), पांजरे १८४ (५९४), रतनवाडी १३४ (९०४), वाकी ४० (३२८).
पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने संपूर्ण जून महिन्यात भंडारदरा धरणात फक्त ७० दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. धरणातील पाणीसाठा आज सायंकाळी ८७० दशलक्ष घनफूट होता. तर मागील वर्षी याच दिवशी भंडारदरा धरणात २ हजार २०१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते.
पावसाने दडी मारल्याने भंडारदरा-निळवंडे धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून पिण्याच्या पाण्याचे पुढील आवर्तन सोडण्यासाठी जलसंपदा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. भंडारदरा धरणाची पाणीपातळी शंभर फुटांपेक्षाही कमी झाली आहे. पाणीपातळी कमी झाल्यामुळे धरणातून जास्त क्षमतेने पाणी सोडता येत नाही. जुलैच्या मध्याला सुटणा-या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाची पूर्वतयारी म्हणून दोन दिवसांपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ४०६ क्युसेकने धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. आज सायंकाळी ३९७ क्युसेकने विसर्ग सुरू होता. या वेगाने धरणातून दिवसभरात जेमतेम ३२-३३ दशलक्ष घनफूट पाणी बाहेर पडते. धरणातून सोडण्यात येत असणारे पाणी निळवंडे धरणात साठविण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासाठी किमान पाचशे ते सहाशे दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे. एवढय़ा पाण्याचा साठा निळवंडे धरणात होण्यासाठी बारा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतरच निळवंडेतून चौदाशे ते पंधराशे क्युसेकने पिण्याचे आवर्तन सोडता येईल. निळवंडे धरणातील पाणीसाठा आता २९९ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला आहे. त्यातील १३५ दशलक्ष घनफूट मृत जलसाठा आहे. १५ जुलैचे आसपास पिण्याचे पाण्याचे आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी भंडारद-यातून पाणी सोडून रिकामे झालेले निळवंडे धरण भरून घेतले जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवडय़ानंतर पावसास सुरुवात झाली नाहीतर जिल्ह्याच्या उत्तर भागात अभूतपूर्व स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे पाणलोट क्षेत्रात आदिवासी शेतकऱ्यांनी पेरा केलेली भातरोपे सुकू लागली आहेत. नजीकच्या काळात पावसाचे पुनरागमन न झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा भातरोपे टाकावी लागतील अशी चिन्हे दिसत आहेत. त्याचा मोठा फटका आदिवासी भागाला बसणार आहे.