चालू शतकातील सर्वात जास्त कालावधीच्या चंद्रग्रहणाच्या दिवशी हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्याने ‘ब्लड मून’चा ‘याची देही, याची डोळा’ आनंद घेऊ इच्छिणाऱ्या खगोलप्रेमींची निराशा होऊ शकते. त्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईतील वातावरण अंशत ढगाळ राहणार असल्याने मुंबईत ग्रहण दिसण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते आहे.

पावसाचा अंदाज असल्याने चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणी सरसावून बसलेल्या मुंबईकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. खगोल मंडळातर्फे खगोल प्रेमींकरिता करण्यात येणारे प्रदर्शन पण अंशत ढगाळ वातावरण असल्याने रद्द केल्याचे समन्वयक डॉ. अभय देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ते नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल. त्यासाठी फिल्टर वापरण्यीच गरज नाही. मात्र त्यासाठी आकाश निरभ्र असणे आवश्यक आहे. आठ इंची किंवा त्यापेक्षा जास्त इंचाच्या दुर्बिणीतून ते अधिक सुस्पष्ट दिसेल. यात चंद्र लालसर दिसणार असून त्याला ब्लड मून असे म्हणतात. मात्र मुंबई आणि कोकणाच्या व्यतिरिक्त उर्वरीत महाराष्ट्राचा भाग पाहता चंद्रग्रहण दिसण्याची शक्यताही धूसर असल्याचे दिसते.  चंद्रग्रहण २७ जुलै रोजी पाहता येणार आहे. हे ग्रहण रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी चालू होऊन २८ जुलै रोजी पहाटे ३ वाजून ४९ मिनिटांनी संपेल.