सरोवराच्या काठावर चारही बाजूने खोदकाम

नागपूर : लोणार सरोवर आणि अभयारण्यातील जैवविविधतेच्या जतनाची धुरा ज्या वन्यजीव विभागाकडे आहे, त्या विभागाकडूनच सरोवराची ऐतिहासिक ओळख मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघडकीस आले आहे. उल्कापातानंतर विवरातून निघालेल्या लाव्हारसामुळे विवराभोवती तयार झालेले ‘इजेक्टा ब्लँकेट’ वन्यजीव विभागाने केलेल्या खोदकामामुळे नष्ट झाले.

लोणार राखीव वनक्षेत्राला ८ जून २०००ला अभयारण्याचा दर्जा मिळाला. लोणार सरोवर आणि परिसर अशा एकूण ३८३ हेक्टर क्षेत्राचे व्यवस्थापन बुलढाणा प्रादेशिक वनविभागाकडे होते. काही महिन्यांपूर्वीच सरोवर आणि अभयारण्याची धुरा वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात आली. त्यामुळे सरोवराचे आणि अभयारण्यातील जैवविविधतेचे संवर्धन होईल, अशी सरोवरप्रेमींची अपेक्षा होती. ‘मी लोणारकर’ समूह त्यातूनच तयार झाला.  मात्र, या अपेक्षेला तडे देण्याचे काम वन्यजीव विभागाकडून सुरू झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनाकरिता सरोवरप्रेमींनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरोवराच्या काठावर व आत शंभर मीटपर्यंत कोणत्याच विभागाने किंवा व्यक्तीने खोदकाम करू नये असे आदेश दिले. न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती गठित केली होती. या समितीने लोणार सरोवराला भेट देऊन ‘इजेक्टा ब्लँकेट’ची पाहणी केली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. मात्र, वन्यजीव विभागाने या आदेशाची अवहेलना करत सरोवराच्या काठावर चारही बाजूने जेसीबीसारखी यंत्रे लावून खोदकाम सुरू केले आहे.

५० हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली. ते १७० मीटर खोल असून त्याचा परीघ ६.५ किलोमीटरचा आहे. बेसॉल्ट खडकातील हे एकमेव विवर असल्याने देशविदेशातील संशोधक येथे संशोधनासाठी येतात. लोणारप्रेमींच्या महत्प्रयासानंतर सरोवर परिसरातील अनेक झोपडपट्टय़ा हटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यात बरीच मदत झाली होती. मात्र, आता वन्यजीव विभागाने सरोवराच्या चारही बाजूला जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांचे खोदकाम सुरू केले आहे. परिणामी, हे ‘इजेक्टा ब्लँकेट’ पूर्णपणे नाहीसे झाले आहे.

दरम्यान, यासंदर्भात विभागीय वनाधिकारी खरणार तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भ्रमणध्वनीवर केलेल्या संदेशाला देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वन्यजीव विभागाचा दुजाभाव

लोणार सरोवराला लागून मंठा ते लोणार हा महामार्ग आहे. शेगाव-पंढरपूर हा पालखी मार्ग असल्याने मंठा बायपासजवळ हा मार्ग येताच वन्यजीव विभागाने अभयारण्यातून रस्त्याच्या कामास मनाई केली. किनगाव जट्ट ते लोणार हा गजानन महाराज यांच्या दिंडीचा रस्ता आहे. याठिकाणीसुद्धा पक्का रस्ता बनवण्यास विभागाने आडकाठी घातली. याच विभागाने अभयारण्यात मात्र जेसीबीसारखी यंत्रे चालवून ‘इजेक्टा ब्लँकेट’ कसे नष्ट केले, असा प्रश्न ‘मी लोणारकर’ समूहाने उपस्थित केला आहे. या समूहाने हे काम थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, पण विभागाने त्यांना दाद दिली नाही.