News Flash

‘फेसबुक फ्रेंड’ने कल्याणच्या रहिवाश्याला अडीच कोटींना गंडवले

याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत, त्यांचं एक पथक दिल्लीलाही जाणार आहे

संग्रहित छायाचित्र

सोशल मीडियाचा वापर हल्ली सगळेचजण करतात. मग ते फेसबुक असो की ट्विटर किंवा इतर माध्यमे असोत. मात्र याच फेसबुकमुळे कल्याणच्या एका नागरिकाला अडीच कोटींचा फटका बसला आहे. नायजेरिन हॅकर्सनी आपले अडीच कोटी एका महिलेच्य माध्यमातून लुटले असा आरोप या कल्याणच्या नागरिकाने केला आहे. स्वप्नील धामणकर असे या माणसाचे नाव आहे. आपली अडीच कोटींना फसवणूक झाल्याचा आरोप त्याने केला आहे.

स्वप्नील धामणकर हे रॉयल थाइ दुतावासात वरिष्ठ व्हिसा ऑफिसर म्हणून काम करतात. स्वप्नील धामणकर हे त्यांची पत्नी अमृता, मुलगा अभिनेश आणि मुलगी संस्कृती सोबत कल्याणमध्ये राहतात. खडकपाडा भागातील महावीर हाइट्स या सोसायटीत त्यांचे घर आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये स्वप्नील धामणकर यांना एका महिलेची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली. या महिलेचे प्रोफाइलवरचे नाव मरियम खुर्शीद असे होते. मी या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ती माझ्याशी चॅटद्वारे बोलू लागली. याच चॅटमध्ये मरियमने मला सांगितले की तिचा नवरा अमेरिकेच्या लष्करात काम करत होता आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या दीराने तिला तेहरान या ठिकाणी येण्यास भाग पाडले असेही मरियमने सांगितल्याचे धामणकर यांनी सांगितले. तसेच आपल्याला एक बारा वर्षांचा मुलगा असूनही दीर लग्नासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचेही तिने सांगितले.

यानंतर एकेदिवशी मरियमने मला सांगितले की तिच्या नवऱ्याचे १८ लाख यूएस डॉलर्स म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे सुमारे अडीच कोटी रुपये मला सुरक्षित ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला भारतात शिफ्ट व्हायचे आहे असेही मरियमने सांगितल्याचे धामणकर यांनी म्हटले आहे. यासाठी तिने माझी मदतही मागितली. तसेच मला भारतात येऊन स्थायिक व्हायचे आणि तिथेच स्वतःचा व्यवसाय करायचा आहे असेही मरियमने सांगितले. ऑगस्ट २०१७ मध्ये मला एका माणसाचा कॉल आला ज्याने स्वतःची ओळख कस्टम ऑफिसर म्हणून करून दिली. त्याने माझ्याकडे ६ लाख ८० हजार रुपये कर स्वरूपात भरण्याची मागणी केली. अँटी टेरिरीस्ट कोड आणि ट्रान्सपोर्ट चार्जेससाठी एवढे शुल्क भरावे लागेल असेही या ऑफिसरने सांगितले. मरियमने तुमच्या नावे जो डॉलर्सचा बॉक्स पाठवला आहे त्याचे हे शुल्क आहे असेही त्याने सांगितले. ज्यानंतर मी बँक अकाऊंटमध्ये ६ लाख ८० हजार रुपये भरले. हे पैसे भरल्यानंतर सप्टेंबर महिन्यात जॉन्स स्कॉटन नावाच्या एका माणसाने मला फोन केला आणि मी मुंबईत पोहचलो असून तुमचा डॉलरचा बॉक्स घेऊन कल्याण या ठिकाणी येतो आहे असे सांगितले.

त्याच दिवशी मध्यरात्री एक नायजेरियन माणूस माझ्या घरी आला आणि त्याने माझ्या हाती डॉलरचा बॉक्स दिला. मी ते खोके उघडले. त्यामध्ये डॉलर्सची सोळा बंडल्स होती. मात्र ती काळी होती. मी याबद्दल त्या माणसाला विचारणा केली असता एक प्रकारच्या केमिकलमुळे हे या डॉलर्सचा काळा रंग जाऊन मूळ रंग परत येईल असे मला त्याने सांगितले. मात्र हे केमिकल घ्यायचे असेल तर अर्धा लीटरसाठी १५ लाख रुपये मोजावे लागतील असे त्या माणसाने सांगितले. मात्र हे केमिकल दिल्लीत मिळेल असे त्याने सांगितले आपल्याकडे ते थोड्या प्रमाणात उरल्याचेही त्याने धामणकर यांना सांगितले
यानंतर धामणकर आणि त्यांची पत्नी दिल्लीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी स्कॉटनला १५ लाख रुपये देऊन अर्धा लीटर केमिकल विकत घेण्यासाठी दिले. त्यानंतर जॉर्ज कारा या माणसाचा फोन आपल्याला आला आणि तुम्हाला आणखी १५ लाख रुपये भरावे लागतील म्हणजे तुम्हाला १ लीटर केमिकल मिळेल आणि १० लाख रुपये त्यावरचा कर म्हणून भरावा लागेल. धामणकर यांनी या माणसावर विश्वास ठेवला आणि त्याच्या खात्यात पैसे भरले.

केमिकल विकत घेऊन धामणकर घरी आले. मात्र जवळ असलेल्या डॉलर्सवर ते कसे लावतात हे ठाऊक नव्हते त्यामुळे त्यांनी नोव्हेंबरपर्यंत वाट बघितली नोव्हेंबर महिन्यात खालु टेक्निशिअन त्यांना भेटला त्याने धामणकर यांना मदतीचे आश्वासन दिले आणि त्याबदल्यात १०० डॉलर्सची मागणी केली. त्यानंतर काही डॉलर्सवर त्याने केमिकल लावले आणि ते डॉलर्स फ्रिजमध्ये ठेवून तो गेला. या डॉलर्सना काही वेळ हात लावू नका त्यांचा रंग बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे असे त्याने धामणकरांना सांगितले. मात्र आम्ही दुसऱ्या दिवशी फ्रिज पाहिला तेव्हा नोटांचा रंग तसाच होता.

त्यानंतर आम्ही काराच्या अकाऊंटला ४२ लाख रुपये भरले. यासाठी आम्ही आमचे रहाते घर विकले असेही अमृता धामणकर यांनी सांगितले. कारानेच खालु टेक्निशिअनला धामणकरांकडे पाठवले होते. मात्र आमच्याकडे असलेल्या डॉलर्सच्या बंडलचा रंग काही केल्या बदलेना.. हे सगळे प्रकार सुरु असताना आम्ही मरियमच्याही संपर्कात होतो. मी माझे सगळे पैसे तुम्हाला पाठवल्याने आता भारतात येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही एक लाख रुपये भरून माझे विमानाचे तिकिट काढा. भारतात आल्यावर मी या प्रकारात लक्ष घालते असे मरियमने धामणकरांना सांगितले. एक लाख रुपये या महिलेच्या अकाऊंटला ट्रान्सफर करेपर्यंत आपण गंडवले जातो आहोत हे धामणकर यांना समजले नाही. त्यांनी मरियमच्या अकाऊंटला पैसे भरल्यानंतर या महिलेचा फोन लागणे बंद झाले. तिचा नंबर अस्तित्त्वात नाही किंवा स्विच ऑफ आहे असे संदेश येऊ लागले. त्यानंतर आमच्याकडे जेवढे नंबर होते त्या सगळ्यांना आम्ही फोन केला पण कोणाचाच फोन लागला नाही. यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात येऊन आम्ही पोलीस ठाणे गाठले असे धामणकर यांनी म्हटले आहे. ‘मुंबई मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांचं एक पथक लवकरच दिल्लीला जाऊनही शोध घेणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 6:16 pm

Web Title: lured with 1 8 million by fb friend kalyan man duped of rs 2 53 cr
Next Stories
1 विमा अधिकारी बेपत्ता, विरार हत्याकांडातील आरोपीची होणार चौकशी
2 ठाण्यात जागोजागी ‘मोहल्ला क्लिनिक’
3 विकासाचे पॅकेज गेले कुठे?
Just Now!
X