महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे. आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मुख्यंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा जंगी स्वरुपात होणार आहे. कारण देशभरातील महत्वाच्या व्यक्ती या या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही या शपथविधी सोहळ्याासाठी निमंत्रण देण्यात आले आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी ही माहिती दिली.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर विविध जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले.