लातूर : मराठवाडा व विदर्भ वगळता सर्वत्र जोरदार पाऊस आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात व नंतर विदर्भात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य अतुल देऊळगावकर यांनी दिली.

या वर्षी मोसमी पाऊस लांबण्याचा अंदाज आल्यानंतर वास्तविक जून महिन्यातच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्याची गरज होती. मात्र, निविदा प्रक्रियेला उशीर लागल्याने आता जुलै महिन्यात ही यंत्रणा सज्ज झाली आहे. भारतीय उष्ण कटीबंधीय हवामान संशोधन संस्थेच्या वतीने  (आयआयटीएम)सोलापूर येथे रडार तनात करण्यात आले आहेत.

सोलापूरपासून २०० किलोमीटर अंतरावर असणारे ढग या रडारच्या टप्प्यात येतात. त्यामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या मराठवाडय़ातील जिल्हय़ांना याचा लाभ होऊ शकतो. ढगामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असेल, वाऱ्याचा वेग फारसा नसेल तर कृत्रिम पाऊस पाडता येतो. ढगामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे यावर पाऊस पडणे अवलंबून आहे. राज्य शासनाने धरणक्षेत्रावरील ढगांना प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्या आहेत. ज्यामुळे पडलेला पाऊस धरण क्षेत्रात पडेल व ते पाणी किमान पिण्यासाठी उपलब्ध होईल. पाऊस पाडण्यायोग्य ढग आल्यानंतर दोन छोटय़ा विमानांमार्फत ढगामध्ये सिल्व्हर आयोडाइड फवारले जाईल. त्यामुळे सर्वसाधारण जो पाऊस पडला असता त्याच्या १५ ते २५ टक्के जास्तीचा पाऊस होतो असा अनुभव आहे.

औरंगाबाद येथे २५ जुलै रोजी अमेरिकेतून मोठे विमान आणले जाणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथून कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा सज्ज होईल. अशीच यंत्रणा विदर्भातील नागपूर येथेही उपलब्ध केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींना वीज प्रतिबंधक उपकरण उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वीज पडून होणारे अपघाती मृत्यू यामुळे टाळले जाणार आहेत. किनवट येथे भूकंपामुळे काही घरांना तडे गेले होते. त्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले असून त्यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आला आहे.

यापूर्वी राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी झाले नव्हते. या वर्षी हे प्रयोग तरी यशस्वी होऊ देत, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे.