कोकण रेल्वे मार्गावर पाच महिन्यांपूर्वी सुरू केलेली मडगाव-रत्नागिरी रेल्वे रिकामी धावत आहे. त्यामुळे रेल्वेला तोटा सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. खासदार विनायक राऊत यांनी प्रवाशांच्या हितासाठी दिवसा गाडी सोडण्याची मागणी केली आहे. दररोज तोटा सहन करत मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव ही १८ डब्यांची गाडी अवेळी चालविली जात आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल यांच्या या तोटय़ात चालविण्यात येणाऱ्या कर्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोकणकन्या, जनशताब्दी, राज्यराणी, मांडवी या रेल्वे कायमच आरक्षणफुल असतात. प्रवासी मिळेल तेथे बसून प्रवास करतात, पण मडगावहून रात्री ८ वाजता मडगाव-रत्नागिरी गाडी सोडली जाते. प्रवासीसंख्या पाहता ही रेल्वे तोटय़ातच चालविली जात असल्याने कोकण रेल्वेच्या कारभाराचे रेल्वेमंत्री प्रभू यांनीच ऑडिट करावे अशी मागणी आहे.
कोकण रेल्वेकडे स्वत:च्या मालकीचे प्रवासी वाहतूक व इंजिन नाही. ही सामग्री कोकण रेल्वेने भारतीय रेल्वेकडून भाडेतत्त्वावर घेतली आहे. भारतीय रेल्वेला कोकण रेल्वे भाडे देत आहे. त्याची वस्तुस्थिती कोकण रेल्वेकडून उघड व्हायला पाहिजे. त्यानंतर यंत्रणेचा कारभार कोकण रेल्वेला तारणारा आहे किंवा कसे हे उघड होईल, असे सांगण्यात आले.
मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या कोकणाच्या वेळापत्रकात अवेळी ठरलेल्या रेल्वेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मडगाव येथे ३१ मार्च २०१५ रोजी केला. या गाडीत प्रवासी संख्या कमी असतानाच अठरा डब्यांची धावते, त्यात महिला, लहान मुलेही असतात पण कोकण रेल्वेचे सुरक्षा पोलीसही नसल्याने हा एक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण झालेले नाही. या सिंगल ट्रॅकवरून ही गाडी क्रॉसिंगसाठी रात्रीच्या वेळी १० ते १५ मिनिटे थांबवली जाते. यादरम्यान नेत्रावती, मत्स्यगंधासह अन्य सुफरफास्ट गाडय़ा धावत असतात. रत्नागिरी स्थानकातून मडगावला धावणाऱ्या गाडीचा महिन्याच्या तिकिटांचा अंदाज घेतल्यास तोटा लक्षात येणार आहे. या गाडीला एप्रिल, जून, जुलै, सप्टेंबर अखेर १८८४ तिकिटे खपली आणि २९१६ प्रवाशांनी प्रवास केल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.