एरव्ही मोठमोठय़ा साहित्य संमेलनातून जो चमत्कार होत नाही तो गेल्या चार दिवस मुंबईत रंगलेल्या ‘टाटा साहित्य महोत्सवा’त घडला. देशभरातील साहित्य आणि साहित्यकारांचा वेध घेणाऱ्या या महोत्सवात लहान मुलांच्या साहित्याचीही दखल घेण्याची गरज ‘टाटा ट्रस्ट’ला वाटली आणि या वेळी त्यांनी पहिल्यांदा बालसाहित्यासाठी पुरस्कार सुरू केला. पहिल्याच वर्षी या पुरस्कारासाठी मराठी भाषेची निवड करण्यात आली होती. मराठीतून गेली अनेक वर्षे सातत्याने लहान मुलांसाठी कथालेखन करणाऱ्या माधुरी पुरंदरे या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचित.

* बालसाहित्य अनेक भाषांमधून हद्दपार झाले असताना मराठीमध्ये अजूनही काही प्रमाणात हे साहित्य जिवंत आहे, मात्र ते पुढे जात नाही. यामागची कारणे काय आहेत?

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

एक तर बालसाहित्याचे महत्त्व कळणे ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. बालसाहित्य हे फक्त मुलांसाठी नसते हेही मान्य व्हायला हवे. ते पालकांनीही वाचले पाहिजे, शिक्षकांनीही वाचले पाहिजे आणि लिहिणाऱ्यांनीही त्या पद्धतीने लिहिले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही राज्यांमधील साहित्य प्रदर्शने मी पाहिली आहेत. तिथल्या लेखकांची केविलवाणी अवस्था आहे. स्वत:च्या खर्चाने पुस्तके काढावी लागतात त्यामुळे पुस्तकांचा, त्यांच्या छपाईचा दर्जा इतका मार खातो की, मुलांना ते हातातही घ्यावेसे वाटत नाही. पण ही केवळ लेखकाची किंवा पालकाची जबाबदारी नाही, तर समाजानेच बालसाहित्य कशासाठी आहे याचा साकल्याने विचार केला पाहिजे. शिक्षण व्यवस्थेतही त्यावर विचार व्हायला हवा. एकोवेळी अनेक स्तरांवर त्याचे पडसाद उमटले तर त्याचा काही फायदा होईल. आत्ताही मुलांसाठी पुस्तके घेताना त्यातून त्यांना काय बोध मिळेल यापेक्षाही त्यावरच्या किमती वाचून आपण पुस्तके खरेदी करतो. या मानसिकतेत बदल व्हायला हवा.

पूर्वीच्या बालसाहित्याचा भर हा संस्कारांवर होता. आत्ताच्या काळानुसार त्यात कुठले बदल व्हायला हवेत असे वाटते?

बाहेर जे बदलले आहे त्यातले दोन-तीन शब्द उचलून मुलांपुढे टाकले म्हणजे ते बालसाहित्य होत नाही किंवा ती त्यांची भाषा होत नाही. तुम्हाला त्यांच्या आतच शिरून साहित्य निर्माण करावे लागते. आधुनिक सगळेच बदल स्वीकारले तरच साहित्य पुढे जाईल, हेही खरे नाही. मी स्वत: वैयक्तिकरीत्या मोबाइल वापरत नाही, इंटरनेटचा फारसा वापर करत नाही, पण तरीही जे मी मुलांसाठी लिहिते ते त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. आमची मुले तुमची पुस्तके वाचून मोठी झाली, असे जेव्हा पालक सांगतात तेव्हा त्यांना त्या पुस्तकातून काही तरी मिळत असणार. आत्ताची पिढी आहे म्हणून तिचा तंत्रज्ञानाशी संबंध जोडून साहित्य निर्माण करा, असे होत नाही. शेवटी त्या मुलाचा जो माणूस बनण्याचा गाभा आहे तिथे हात घालण्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे क रावेच लागतात. तेव्हा कुठे तुम्ही त्यांच्या जगाशी जोडले जाता. या सगळ्या जाणवण्याच्या गोष्टी आहेत.

* पाठय़पुस्तकांचे स्वरूप बदलण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत?

पाठय़पुस्तकांचे स्वरूप बदलण्यासाठी पालक आणि शिक्षकांनाच प्रयत्न करावे लागणार. रस्त्यावर उतरा, संप करा, मुलांना शाळेत पाठवणे बंद करा.. फी वाढ झाली की कसे पालक रस्त्यावर उतरतात. मग पाठय़पुस्तकांमध्ये बदल हवे असतील तर सरकारशी भांडा. कुठल्याही गोष्टीसाठी किंमत द्यावीच लागते त्याशिवाय बदल होणार नाही.

ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलांसाठीच्या साहित्यात फरक असायला हवा का?

ग्रामीण आणि शहरी साहित्यात फरक असणारच. आपली संस्कृतीच अशी आहे की अगदी शहरा-शहरांमधली संस्कृती, वैचारिक स्तर भिन्न आहेत. पण या दोन्हीतील फरकोंचा विचार करून त्यांना एकत्र आणणारे साहित्य निर्माण व्हायला हवे. तसे होत नाही कारण आमच्या लेखनात दोष आहे, चित्रकलेत दोष आहे. त्याच्यावरची मेहनत घेण्याची आमची तयारी नाही. इथे बसून अमेरिकेत घडणाऱ्या गोष्टींची पुस्तके आपण वाचू शकतो. जन्मात बर्फही न पाहिलेला माणूस तिथले हिवाळे, राहणीमान या सगळ्या गोष्टी वाचतो. मग रोज जे आपल्या आजूबाजूला घडते ते मला का वाचता येऊ नये? त्यामुळे तो प्रश्नच नाही.

इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी बालसाहित्यात घट होते आहे का?

चांगले साहित्य मराठीत द्या, मुले नक्की वाचणार. इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने त्यांचे वळण त्या भाषेतले आहे. त्यामुळे त्यांना मराठीकडे यायला वेळ लागेल. पण त्यांनी मराठीत ते वाचलेच पाहिजे इतक्या चांगल्या दर्जाचे लेखनही त्यांना द्यायला हवे.

बालसाहित्याच्या प्रसारासाठी सरकारकडूनही प्रयत्न व्हायला हवेत, असे वाटते का?

आपल्याला जे हवे ते आपणच मिळवले पाहिजे. सरकारकडून थोडे-थोडे प्रयत्न होतात, पण एक-दोन चांगली माणसे असली की काम वेगाने पुढे सरकते. सत्ताबदल झाला, नवीन माणसे आली की ते काम थांबते. त्यामुळे बालसाहित्यासाठी किमान पातळीवर एक व्यवस्था उभी राहिली पाहिजे. सरकार बदलले तरी त्याचा या व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, अशी स्वतंत्र, सक्षम व्यवस्था हवी. त्यासाठी पालक-शिक्षक-लेखक सगळ्यांचेच एकत्रित प्रयत्न हवेत. ‘वाचू आनंदे’चा संच आम्ही केला वास्तविक, असे संच शिक्षकांनी तयार के ले पाहिजेत. कारण मुलांना काय हवे-काय नको, याचा त्यांना जास्त अनुभव असतो. बाहेरच्या देशातील पुस्तके तेथील शिक्षक तयार करतात. ‘वाचू आनंदे’चा संच अजून वापरतात ना शाळेमध्ये.. पण पंधरा वर्षे झाली तरीही त्यानंतर नवीन लिहिले गेले नाही. उलट मलाच विचारतात, तुम्ही त्याचे पुढे काही करणार का? हे नाही चालणार. फ्रान्समध्ये क्रांती झाली तेव्हा तिथले पालक आपल्या छोटय़ा-छोटय़ा मुलांना घेऊन रस्त्यावर उतरले होते. आपल्याकडे तसे होत नाही. आपल्याला तयार उत्तरे हवी आहेत, सोप्या गोष्टी हव्यात. साहित्याकडे पाहण्याची संकुचित मानसिकता बदलल्याशिवाय काही होणार नाही.