26 February 2021

News Flash

‘पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची सुरुवात करा’

पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे.

पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभीर्याने विचार करून कोणी काही तरी करील यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करा. केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता सजीव सृष्टीसाठी व भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरुवात करा, असे आवाहन ज्येष्ठ संशोधक प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे केले. पर्यावरण सप्ताहानिमित्त येथील नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप या विषयावर ते बोलत होते.
अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तथापि सध्याच्या काळात पर्यावरण समतोल ही मानवाच्या दृष्टिकोनातून, तसेच या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी महत्त्वाची गरज असल्याचे सांगून प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर म्हणाले की, वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या गरजा, वाढते शहरीकरण, कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदीमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. वाढत्या तापमानामुळे ऋतुमानात बदल झाला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पातळीवर सर्व देशांकडून याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तथापि याबाबत आपण स्वत: काय करू शकतो याचा आता गांभीर्याने विचार करायला हवा.
आपण घरी फ्रीज, बॉडी स्प्रे, एअर कंडिशनर आदींचा वापर करतो, पण यामधून क्लोरो फ्युरो कार्बन वायू वातावरणात मिसळतो. तो अत्यंत घातक आहे. अतोनात प्लास्टिकचा वापरही टाळायला हवा. एक प्लास्टिकची कॅरी बॅग नष्ट व्हायला ५०० वर्षे लागतात. कागदी बॅग सहा आठवडय़ात नष्ट होते. मग आपण प्लास्टिकचा वापर करायचा का? याचा विचार करावा, असेही त्यांनी या वेळी सूचित केले.
पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे तसेच विविध वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या आवरणाला खिंडार पडले आहे. यामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण तडक पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका आहे. तापमानवाढीने उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे देशातील समुद्र किनाऱ्यावरील लोकवस्ती पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. या सर्वाचा प्रत्येकाने विचार करायला हवा, असे सांगून प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर म्हणाले की, वृक्षलागवड करणे, तो वृक्ष सुव्यवस्थित वाढविणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, क्लोरो प्युरो कार्बन उत्सर्जित करणाऱ्या साधनांचा वापर टाळणे, सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, वाहनांचा वापर कमीत कमी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, यासारखे वैयक्तिक स्तरावर आपण प्रयत्न केल्यास पर्यावरण पूरक कार्यास आपण निश्चित हातभार लावू शकतो.
निसर्गात दोन घटक महत्त्वाचे आहेत. निर्जीव व सजीव, निर्जीव म्हणजे पंचमहाभूते यामध्ये हवा, पाणी, जमीन-माती, प्रकाश व ऊर्जा या पाच बाबी प्रदूषणमुक्त ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे. असे सांगून प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर म्हणाले की, लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती वाढत नाही. नैसर्गिक चक्र आबाधित राखून पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लागवड व त्याची जपणूक करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. वामन पंडित यांनी प्रारंभी डॉ. मधुकर बाचुळकर यांचा परिचय करून दिला. निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी स्वागत केले. या व्याख्यानास जिल्हास्तरीय अधिकारी- कर्मचारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:37 am

Web Title: madhukar bachulkar comment on environmental balance
Next Stories
1 माथेरानला फिनॅक्युलर रेल्वेने जोडण्यासाठी हालचाली
2 सुटीच्या हंगामात कोकणात ९३ अपघाती मृत्यू
3 सांगोला शेतकरी सहकारी, स्वामी समर्थ कारखान्यांचा लिलाव
Just Now!
X