आदिवासी समाजासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते मधुकरराव पिचड यांनी केली. ते शुक्रवारी नाशिक येथील सर्वपक्षीय आदिवासी मेळाव्यात बोलत होते. मधुकर पिचड हे यापूर्वीच्या सरकारमध्ये आदिवासी विकासमंत्री होते. मात्र, त्यावेळी आमदार आणि मंत्री असल्यामुळे माझ्यावर काही मर्यादा होत्या. मात्र, आता मला कोणतीही बंधने नसल्याने मी आदिवासींच्या भल्यासाठी खुलेपणाने काम करू शकतो, असे त्यांनी यावेळी म्हटले. फडणवीस सरकारकडून आदिवासी समाजाच्या कोट्यातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात आल्यास त्याचा आम्ही तीव्र विरोध करू, असा इशाराही पिचड यांनी दिला. वेळ आल्यास मुंबई शहराचा पाणीपुरवठा तोडू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी मेळाव्यात घेतला. आदिवासी समाजाच्या कोट्यातून इतरांना आरक्षण मिळाले तर शिक्षण आणि नोकरीअभावी या समाजाच्या अस्तित्वारच प्रश्नचिन्ह उभे राहील, असेही त्यांनी सांगितले. सरकारकडून आदिवासींच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीला अनेक स्तरांवर गळती लागत असल्याने त्याचा विशेष फायदा होत नाही. या कारणामुळे आदिवासी समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे आदिवासींना स्वतंत्र राज्य द्यावे, जेणेकरून त्यांचा विकास सुकर होईल, अशी मागणी पिचड यांनी मेळाव्यात केली.