मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाणी सोडल्याने गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे ५ मीटर पर्यंत उघडावे लागले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात आलेल्या या पुराला मध्यप्रदेश राज्यातील भाजपा सरकार कारणीभूत असल्याची टिका राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, आता टिका करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री व मंत्री कोल्हापूर,सांगली,सोलापूर येथे पूर आला तेव्हा झोपून होते,असेही ते म्हणाले.

ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना सरकारवर टिका करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. या मानव निर्मित पुराला मध्यप्रदेश सरकार सर्वस्वी जबाबदार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. या पुरामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर या चार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी, सावली तालुक्यात तर ८० हजार हेक्टर पेक्षा अधिक शेती पुरात वाहून गेली. घराघरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, घरात असलेले साहित्यांचे नुकसान झाले. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी सोडल्याने गोसिखुर्द प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे ५ मीटर पर्यंत उघडावे लागले. त्यामुळे १९९५ पेक्षाही भीषण महापूर बघावा लागला. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या महापुरात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे वाहून गेली, तर काही मृत्यमुखी पडली. हजारो नागरिकांच्या घराघरात पाणी गेल्याने घरातील अन्न धान्य, कपडे, साहित्य यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी बोट व हेलिकॉप्टरद्वारे करून या भीषण परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. तसेच, पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी व अन्न-धान्य पोहचवण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरफच्या टीम पाचारण केल्यामुळे पूरग्रस्त लोकांना दिलासा देण्याचे काम देखील केले गेले.