भारतात लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजुरांचं स्थलांतर देशानं पाहिलं आहे. वांद्रे स्थानकाबाहेर शेकडोंच्या संख्येनं जमा झालेले परप्रांतीय मजूर आणि त्यांना पांगवण्यासाठी झालेला लाठीमार ही दृश्य देखील सगळ्यांनी पाहिली असताना आता पुन्हा एकदा मजुरांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. हे स्थलांतर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये होऊ लागलं आहे. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या बसस्टँडवर मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या बससाठी मजुरांनी रांगा लावल्या असल्याचं चित्र दिसत आहे.

मध्य प्रदेश सरकारने २० मार्चपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या आणि मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राकडे येणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं होतं. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही बससेवा दीर्घकाळ खंडित राहण्याची भिती नागपूर बसस्टँडवर जमलेल्या मजुरांमध्ये दिसून येत आहे. “महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यादरम्यानच्या प्रवासी बसेस बंद होण्याबद्दल आम्हाला समजलं आहे. त्यामुळेच आम्ही आज परत जात आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यातल्याच एका मजुरानं एएनआयशी बोलताना दिली आहे.

 

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात सुमारे ७४ हजार रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यात निर्बंध जाहीर केले आहेत. तसेच, लोकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर नाईलाजाने लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय निवडावा लागेल, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील वाढती रुग्णसंख्या हा आरोग्य प्रशासनासाठी आणि सरकारसाठी चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट